परभणी : जिल्ह्यात खरिप हंगामात अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतक-यांनी विमा कंपनीकडे नुकसान भरपाई विम्यासाठी अर्ज कलेलेला आहे. परंतू तांत्रिक कारणामुळे अद्याप शेतक-यांना पीक विमा मिळाला नसल्याने आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वात बुधवार, दि.६ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आ. पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नावर बैठक बोलावण्यात येणार असल्याचे सांगितल्याने टाळे ठोको आंदोलन रद्द करण्यात आले.
परंतू शासनाने १५ दिवसांत पीक विमा कंपनीला विमा वाटपाचे आदेश न दिल्यास कृषी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशारा देत जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी आ. पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिला.
शेतक-यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सोयाबिनचे ग्रीन व ड्राय वेटेज घेऊन नुकसान काढण्यात येणार होते. यासाठी ऑल इंडीया इन्शुरन्स कंपनीने दुजोरा दिला होता. परंतू या प्रकरणामध्ये जिल्ह्यातील १८ मंडळ वगळण्यात आली आहेत. तसेच परभणीतील ९ पैकी ८ मंडळ अतिवृष्टी नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. तांत्रिक त्रुटीअभावी शेतकरी पिक विम्यापासून वंचित आहेत. शासनाच्या निर्देशानुसार सुकवणी प्रयोगाचा अवलंब करणे कंपनीसाठी बंधनकारक आहे. या संदर्भात शासनाला वारंवार निवेदन देण्यात आले आहेत. परंतू याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने या विरोधात शिवसेना उबाठाचे आ. डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनाची दखल घेत जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आ. पाटील व आंदोलकांची भेट घेऊन या संदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येणार असून जिल्हास्तरीय कमिटी स्थापन केल्याचे सांगितले. या बैठकीचा अहवाल सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे सांगितल्याने जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले. त्यामुळे कार्यालयाला टाळे ठोकण्याचे आंदोलन तात्पुरते स्थगीत करण्यात आल्याचे आ. पाटील यांनी सांगितले. सरकारने जिल्हा कमिटीचा अहवाल मिळताच १५ दिवसांत तांत्रिक त्रुटी दूर करून पिक विमा कंपनीला विमा वाटपाचे आदेश न दिल्यास कृषी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तसेच परभणी जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी आ. डॉ. पाटील यांनी दिला. या आंदोलना शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

