27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeपरभणीवनामकृवित शिवजयंती उत्साहात साजरी

वनामकृवित शिवजयंती उत्साहात साजरी

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात दि.१९ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. या कार्यक्रमाच्या प्रारंभी कुलगुरू यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत करून प्रतिमेचे विधिवत पूजन व अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, कुलसचिव संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता दीपक कशाळकर, नियंत्रक अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, क्रीडा अधिकारी संघर्ष शृंगारे, विद्यार्थी प्रतिनिधी तथा उत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातून आपण अनेक प्रेरणादायी मूल्ये आत्मसात केली पाहिजेत. त्यांनी रुजवलेली स्वराज्याची भावना आजही आपण अंगीकारली पाहिजे. समाजहितासाठी महान कार्य करण्याचे गुण आपण सर्वांनी अंगीकारावेत असे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही विनम्र अभिवादन केले.

प्रास्ताविक विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने नेत्रदीपक सादरीकरण केले. विद्यार्थिनी साक्षी इंगळे यांनी केलेल्या शिवगर्जना आणि ऋतुजा वारे हिने केलेल्या भाषणामुळे संपूर्ण सभागृहात उत्साह संचारला. दुपारी ४ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमांतर्गत विविध महाविद्यालयांच्या वतीने आयोजित स्पर्धांमधील विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली. सूत्रसंचालन विद्यार्थी वामन काळबांडे व आशुतोष मदेवाड यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी केले. यामध्ये विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR