यवतमाळ : प्रतिनिधी
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय समन्वयक श्याम मानव आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे.
श्याम मानव आणि जरांगे-पाटील यांच्या रूपाने देवेंद्र फडणवीस यांच्या अंगावर कुत्रे सोडले आहेत, असे खासदार बोंडे यांनी म्हटले आहे. खासदार बोंडे यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. ते यवतमाळमध्ये भाजपच्या अधिवेशनात बोलत होते.
अनिल बोंडे म्हणाले, खोटे नॅरेटिव्ह आपल्याला खोडणे आवश्यक आहे. गैरसमज पसरवणारा पसरवणारच आहे. फेक नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह करून रडत बसण्यात अर्थ नाही. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे. ते खोटे बोलणारच आहेत. आता ते एकटे खोटे बोलणार नाहीत. त्यांनी आता अंगावर कुत्रे सोडले आहेत. एक श्याम मानवच्या रूपात सोडला की देवेंद्र फडणवीसांवर वाईट-वाईट बोल. एक मनोज जरांगेसारखा सोडला आहे.
मनोज जरांगे मराठा आरक्षण, मराठा आरक्षण करतो. आत्तापर्यंत मराठा मुख्यमंत्री किती होते? यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. पण, ज्यांच्या सांगण्यावरून तू बोलतोय, ते शरद पवारसाहेब सुद्धा मुख्यमंत्री होते. तेव्हा शालिनीताई पाटील मराठा आरक्षण मागत होत्या. तेव्हा काय झालं? असा सवाल अनिल बोंडेंनी उपस्थित केला आहे.