नवी दिल्ली : १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मंगळवारपासून सुरू होईल. २०२६ मध्ये तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी आसाममध्येही निवडणुका होतील, परंतु एसआयआर वेळापत्रक अंतिम नाही. या १२ राज्यांमध्ये एसआयआर दरम्यान आयोगाचे लक्ष नागरिकत्व पडताळणीवर आहे.
आसाममध्ये मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण केले जाईल. परंतु नागरिकत्व पडताळणी होणार नाही. राज्यातील गुंतागुंतीच्या नागरिकत्वाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर आयोग हे नवीन मॉडेल विकसित करत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एसआयआर जाहीर करताना सांगितले की, आसाममध्ये नागरिकत्वाबाबत स्वतंत्र तरतुदी आहेत. राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने आसामसाठी स्वतंत्र आदेश जारी केला जाईल. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, केरळ, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, प.बंगाल, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटे आणि पुद्दुचेरी येथे एसआयआर लागू केला जाईल. तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि केरळ सरकारांचा विरोध आहे. द्रमुकने त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
















