नांदेड : प्रतिनिधी
वजिराबाद हद्दीतील हिंगोली गेट परिसरातील केएफ एंटरप्रायजेस फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे (रा. माळकौठा, ता. मुदखेड) यांचा मृतदेह आढळल्या प्रकरणी सखोल तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वेंजने यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करणार आहे.
एसआयटीमध्ये ३ पोलिस अधिकारी आणि ६ पोलिस अंमलदारांचा समावेश आहे. अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव पथकाच्या तपासाचा वेळोवेळी आढावा घेणार आहेत. मृत शेतक-याच्या पत्नी ज्योती शिंदे यांच्या फिर्यादीनुसार २२ ऑक्टोबर रोजी माळकौठा येथील मारोती मंदिराजवळून २ अनोळखी व्यक्तींनी चंद्रकांत शिंदे यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून नांदेड येथील फायनान्स कार्यालयात आणले. तेथे २ दिवस डांबून ठेवून मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात जयकुमार ऊर्फ भैया गायकवाड, शेख आमेर शेख हुसेन आणि इरफान खान शहबाज खान या तिघांना २५ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली तर कार्यालयातील कॅशिअर शेख मुदशीर शेख खदीर याला २६ ऑक्टोबर रोजी अटक झाली. ४ आरोपी २९ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत आहेत.
मुजोर फायनान्स कंपन्यांवर थेट गुन्हे दाखल होणार
नांदेडमधील शेतक-याच्या मृत्यूच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व पोलिस अधीक्षकांना शेतक-यांच्या तक्रारी तातडीने नोंदवून घेऊन संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच कर्जवसुलीसाठी दमदाटी किंवा बळाचा वापर करणा-या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या वरिष्ठ अधिका-यांवरही कारवाई केली जाईल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे फडणवीस म्हणाले.
















