नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारत जितका प्राचीन आहे तितकाच शेती आणि अन्न यासंबंधीच्या आपल्या समजुती आणि अनुभवही प्राचीन आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या धर्मग्रंथात सर्व पदार्थांमध्ये अन्न श्रेष्ठ असल्याचे सांगितले गेले, म्हणून अन्न हे सर्व औषधांचे मूळ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच छोटे शेतकरी भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद आहे. ब-याच विकसनशील देशांची अशीच स्थिती आहे. भारताचे हे मॉडेलच अनेक देशांत उपयुक्त ठरू शकते, असे पंतप्रधान म्हणाले. यासोबतच भारतात जमिनीला डिजिटल ओळख क्रमांक देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय कृषी अर्थशास्त्रज्ञ परिषदेच्या ३२ व्या आवृत्तीचे उद्घाटन केले. त्यावेळी ते बोलत होते. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र कॅम्पसमध्ये ही परिषद पार पडत आहे. जगभरातील शेती आणि त्याच्याशी संबंधित समस्यांवर उपाय शोधण्यासाठी दर ३ वर्षांनी ही परिषद आयोजित केली जाते. भारतात १९५८ नंतर म्हणजे ६५ वर्षांनंतर याचे आयोजन करण्यात आले. ३ ते ७ ऑगस्ट २०२४ दरम्यान ही परिषद होत आहे.
अन्न सुरक्षा हे जगातील सर्वांत मोठे आव्हान आहे. अशा स्थितीत लहान शेतकरी हे भारताच्या अन्न सुरक्षेचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे. कृषी हे आपल्या आर्थिक धोरणाचे केंद्र आहे. देशातील ९० टक्के शेतक-यांकडे खूप कमी जमीन आहे. हे छोटे शेतकरी भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद आहे. आशियातील अनेक विकसनशील देशांमध्ये हीच परिस्थिती आहे. त्यामुळे भारताचे मॉडेल अनेक देशांमध्ये उपयुक्त ठरू शकते. दरम्यान, देशातील जमिनी डिजिटल करण्यासाठी सरकार मोहीम राबवत आहे. शेतक-यांना त्यांच्या जमिनीसाठी डिजिटल ओळख क्रमांकही दिला जाईल, असेही पंतप्रधान म्हणाले.
दूध, डाळी, मसाल्यांचा
भारत मोठा उत्पादक
गेल्या वेळी येथे आयसीएई परिषद झाली, त्यावेळी भारताची अन्न सुरक्षा आणि भारतीय शेतीचा काळ आव्हानांनी भरलेला होता. मात्र आज भारत अतिरिक्त अन्नधान्याचा देश बनला आहे. आज भारत दूध, डाळी आणि मसाल्यांचा सर्वात मोठा उत्पादक आहे, तर अन्नधान्य, फळेभाज्या, कापूस, साखर, चहा, मासे उत्पादनात दुसरा देश आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
७०० हून अधिक कृषि विज्ञान केंद्रे
भारतीय कृषी संशोधन परिषदेकडेच १०० हून अधिक संशोधन संस्था आहेत. कृषी आणि संबंधित विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतात ५०० हून अधिक महाविद्यालये आहेत. भारतात ७०० हून अधिक कृषी विज्ञान केंद्रे आहेत, जे शेतक-यांपर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचवित आहेत.
बाजरीची सुपर फूड म्हणून ओळख
भारत हा बाजरीचा सर्वात मोठा उत्पादक आहे. ज्याला जग सुपर फूड म्हणतो आणि आम्ही त्याला श्री अन्नची ओळख दिली आहे. भारतातील विविध सुपर फूड्स जागतिक पोषणाची समस्या संपवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.