पुणे : प्रतिनिधी
दिवाळी म्हटले की लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फटाक्यांची आतषबाजी करण्याचा उत्साह असतो. बाजारातही विविध प्रकारचे मोठ्या आवाजाचे तसेच रंगीबेरंगी धूर सोडणारे फॅन्सी फटाके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र, या फटाक्यांमधून बाहेर पडणारा धूर आणि मोठ्या आवाजाचे फटाकेआरोग्यासाठी घातक ठरू शकतात. विशेषत: लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दमा, अॅलर्जी, हृदयविकार तसेच फुफ्फुसांच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना याचा सर्वाधिक धोका आहे. फटाक्यांच्या धुरामुळे श्वसनमार्गाला त्रास होण्याबरोबरच फुफ्फुसांवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. तर मोठ्या आवाजामुळे कानांच्या तक्रारींसह हृदयविकाराच्या रुग्णांवरील ताण वाढण्याची शक्यता असल्याने दिवाळीचा आनंद घेताना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.
फटाके जाळल्यानंतर हवेत सूक्ष्म धूलिकण, धूर आणि विविध रासायनिक घटक मिसळतात. हे कण श्वासावाटे शरीरात गेल्याने डोळ्यांची जळजळ, घशात खवखव, खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत जडपणा अशा तक्रारी उद्भवू शकतात. विशेषत: लहान मुलांची श्वसनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना प्रदूषित हवेचा अधिक त्रास होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिकांमध्ये आधीपासून असलेल्या श्वसनविकारांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. दमा, सीओपीडी, ब्राँकायटिस यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.
मोठ्या आवाजामुळे कानांनाही धोका
फटाक्यांच्या धुराइतकाच मोठ्या आवाजाचा परिणामही आरोग्यावर होतो. विशेषत: कानाजवळ मोठ्या आवाजाचे फटाके फुटल्यास कानात गुंजन होणे, ऐकू कमी येणे, कान दुखणे किंवा काही वेळासाठी ऐकण्याची क्षमता कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांच्या कानांवरही याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आवाज करणा-या फटाक्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे आवश्यक आहे.
















