19.9 C
Latur
Saturday, September 14, 2024
Homeनांदेड‘एकमत’ कडून समाजजागृतीचे काम : डॉ.मनोहर चासकर

‘एकमत’ कडून समाजजागृतीचे काम : डॉ.मनोहर चासकर

नांदेड : प्रतिनिधी
वृत्तपत्र हे समाजाला जागृत करण्याबरोबरच हिंमत देण्याचे काम करते. ही महत्त्वपूर्ण भूमिका पुरोगामी विचाराचे एकमत नेटाने पार पाडत आहे. तीन तप यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर चौथ्या तपातही ही गती कायम राहावी, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर यांनी केले.

एकमतच्या कृतज्ञता सन्मान व स्रेहमेळावा सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात उत्साहात पार पडला. यावेळी कुलगुरु डॉ.चासकर बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी एकमतचे व्यवस्थापकीय संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, कवयित्री आशाताई पैठणे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी नांदेडचे नुतन खासदार वसंतराव चव्हाण यांचे निधन झाल्याने त्यांना एकमत परिवार व मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व एकमतचे संस्थापक लोकनेते विकासरत्न विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून झाली.
पुढे बोलताना डॉ.मनोहर चासकर म्हणाले की, मी नांदेडमध्ये व मराठवाड्यात तसा नवीनच आहे. मात्र माझ्यासाठी एकमत नवीन नाही. मुख्यमंत्री असताना आदरणीय विलासराव देशमुख पुण्याला यायचे. त्यावेळी एकदा त्यांच्यासोबत गाडीत जात असताना मला गाडीत एकमत वृत्तपत्र दिसले. तेव्हापासून मला एकमतची ओळख आहे.

कुठलेही वृत्तपत्र इतका दीर्घकाळ सातत्याने चालविणे हे कठीणच पण एकमतने हे आव्हान अत्यंत लिलया पेलले आहे. वृत्तपत्राचे काम हे समाजातील घटना घडामोडींची माहिती वाचकांना करून देणे याबरोबरच समाजाचे प्रबोधन करण्याचेही आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी वृत्तपत्रांनी सजग भूमिका बजवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR