सोलापूर : तृतीयपंथीयाशी अनैतिक संबंध त्यात पतीचा अडसर मग काय पत्नीने अडसर ठरणा-या पतीचा तृतीयपंथीयाच्या मदतीने खून केला. उलट पती हरवल्याची तक्रारही त्याच खून करणा-या पत्नीने पोलिसात दिली.
अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचा तृतीयपंथीय मित्राच्या मदतीने खून करून रेल्वे मार्गावर टाकून दिल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी पत्नी व तिच्या तृतीयपंथीय प्रियकराला अटक केली आहे.
मंगळवारी ( दि. ७ मार्च) रामबाग झोपडपट्टी परिसरात राहणारा वैभव हा सायंकाळच्या सुमारास अर्बन बँक चौकाकडे म्हणून गेला. त्यानंतर तो गायब झाला होता. ८ तारखेला वैभव मगर याच्या पत्नीने नवरा हरवल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात दिली.
त्यानुसार पोलिसांनी वैभव यांच्या मोबाइलचे कॉल रेकॉर्डिंग तपासले. दरम्यान, सांगोला तालुक्यातील मांजरी गावच्या हद्दीत रेल्वे रुळावर एका व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याला मिळाली. त्यामुळे हरवलेल्या व्यक्तीचे वर्णन आणि सांगोला तालुक्यात सापडलेल्या मृतदेहाचे वर्णन मिळतेजुळते असल्यामुळे पंढरपूर पोलिसांनी या संदर्भात सांगोला पोलिसांकडे अधिक चौकशी केली.
त्यानंतर पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले. त्यावेळी मृताची पत्नी व तृतीयपंथी अक्षय रमेश जाधव यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या अनैतिक संबंधांमध्ये वैभव मगर अडथळा ठरत असल्यामुळे त्या दोघांनी वैभव याला सांगोला रोडवरील दाते मंगल कार्यालय येथे ठार मारले व त्याचा मृतदेह खासगी वाहनातून मांजरी (ता. सांगोला) येथील रेल्वे रुळावर टाकून दिला. या खूनप्रकरणी पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. तर खासगी वाहनाचा चालक अमोल खिलारे याचा पोलिस शोध घेत आहेत.