प्रतिनिधी/सोलापूर
मागील दोन लाटेचा अनुभव आणि ओमिक्रॉनच्या संसर्गावर नियंत्रम आणण्यासाठी मास्क,सोशल डिस्टन आदी नियमावली कडक करण्यात येणार आहेत. तसेच क्वारंटाईन सेंटर सुरू करणे, टेस्टींग वाढविणे, लसीकरणाचा वेग वाढविणे आदी पूर्वतयारी महापालिकेकडून करण्यात येणार आहे.
ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी दोन डोन घेतलेल्या नागरिकांना घराबाहेर पडण्याची मुभा असणार आहे. ज्यांनी लस घेतली नाही किंवा कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ५०० रुपये ते ५० हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.तसेच तिस-या लाटेची पूर्व तयारी म्हणून क्वारंटाईन सेंटर सुरु करणे, कोरोना टेस्टींगला गती देण्यात येणार असल्याची माहिती महापाल्ािकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.
कोरोनापेक्षा जलदरित्या संक्रमित होणारी ओमिक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सोमवारी महापालिकेला नवे आदेश दिले आहेत. या नव्या आदेशानुसार प्रत्येक नागरिकाला लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक असून सार्वजनिक ठिकाणी वावरताना दोन डोस पूर्णझाल्याचा पास जवळ बाळगणे आवश्यक आहे. तसेच सण, समारंभ, राजकीय मेळावे हे बंदिस्त सभागृहातच झाली पाहिजेत आणि सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के इतकी संख्या उपस्थिती असली पाहिजे. तसेच लसीचे पास बघूनच कामानिमित्त येणा-या नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रवेश मिळणार आहे.
लस न घेतल्याचे आढळल्यास त्याच्यावर पाच हजार रुपयांची कारवाई करून लसीचे डोसही देण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त परदेशातून येणा-या व्यक्तींची तपासणी करून त्यांना ४८ तास देखरेखीखाली ठेवण्यासाठी जुळे सोलापुरातील म्हाडा येथील क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात येणार आहे. लसीकरणाबरोबर मास्क, सोशल डिस्टन आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक राहणार असल्याचेही नव्या आदेशात म्हटले आहे. एकही डोस न घेतलेले आणि कालावधी संपूनही दूसरा डोस न घेतलेल्या नागरिकांवर पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच डोस पूर्ण न करताच आस्थापनामध्ये बसलेल्या व्यापा-यांना मात्र ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.