सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी एक लाख ४१ हजार ३४८ पिशव्या म्हणजेच ७०६ गाड्यांची आवक आली होती. एकाच दिवसात ८५ लाखांची उलाढाल झाली. पण, आवक वाढली असतानाही कांद्याचे दर मात्र कमी झाले आहेत. सरासरी दर १२०० रुपये तर उच्चांकी दर दोन हजार १५० रुपयांवर स्थिरावला आहे.
दरम्यान अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा कांदा लागवड विलंबाने झाली आणि त्यामुळेच आता आवक वाढली आहे. परंतु, बाजारात जुना कांदा मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्याने कांद्याची टंचाई भासली नाही. दरम्यान, कांदा बियाणे, मशागत, रोपांची लागवड, काढणी, चिरून पिशव्यात भरून बाजार समितीपर्यंत आणायला मोठा खर्च आहे. त्यामुळे कांद्याला प्रतिंिक्वटल अडीच ते तीन हजार रुपयांचा दर मिळेल, अशी शेतक-यांना आशा होती.
त्या आशेतून पाऊस थांबल्यानंतर सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, पुणे, जिल्ह्याच्या सीमेवरील कर्नाटक भागात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर झाली. उशिराने लागवड झाल्याने नवीन कांदा डिसेंबरअखेरीस बाजारात आला. आता आवक दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, जसजशी आवक वाढेल, तसा भाव कमी होत असल्याची स्थिती आहे.
नोव्हेंबरअखेरीस सोलापूर बाजार समितीत कांद्याला प्रतिंिक्वटल अडीच हजार रुपयांपर्यंत भाव होता. सरासरी दर दीड हजार रुपये मिळत होता. जुन्या कांद्यामुळे दर वाढत नव्हते. आता नवीन कांद्याची आवक वाढली, पण दर मात्र वाढण्याऐवजी कमीच झाला. १ जानेवारीपासून कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढतच आहे. सोलापूर बाजार समितीत दररोज सरासरी ६५० गाड्या कांदा आवक आहे. मंगळवारी बाजार समितीत जवळपास अडीच हजार शेतक-यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता. त्यातून ८५ लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त (२६ जानेवारी) सोलापूर बाजार समिती गुरुवारी बंद राहणार आहे. त्यामुळे कांदा लिलाव त्यादिवशी होणार नाही, याची नोंद शेतक-यांनी घ्यावी, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले आहे.