सोलापूर : कामात हलगर्जीपणा करणा-या शेळगीच्या तलाठी माधवी गुरव यांच्यावर प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
कर्तव्यात कसूर करणे, चुकीची माहिती देणे आदी तक्रारी प्रांताधिकारी यांना प्राप्त झाल्या होत्या. शेळगी परिसरात सिटी सर्व्हे बंद करून ७/१२ देण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी काढले होते. शेळगी भागातील ७९ गटांची माहिती भूमिअभिलेख कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिले होते.
असे असताना त्यांनी पाच महिन्यात केवळ १५ गटाचे ७/१२ केले होते. दिलेल्या कामात हलगर्जीपणा केला. नोटिशीला उत्तर दिले नाही, चुकीची माहिती दिली. कामकाजात टाळाटाळ करणे, कर्तव्यातकसूर करणे, कार्यालयात गैरहजर राहणे, दफ्तर तपासणीला मागितले असता ते उपलब्ध करून न देणे असे अनेक ठपके ठेवण्यात आले आहेत.
सर्व तक्रारींची दखल घेऊन २८ जुलै रोजी प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी निलंबनाचा आदेश काढला. या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.महिला तलाठीच्या कामाबद्दल सर्कल, तहसीलदार यांचे अहवाल आले होते. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्याकडूनही एक रिपोर्ट आला होता. लोकांच्याही तक्रारी होत्या. त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असे प्रांताधिकारी हेमंत निकम, यांनी सांगीतले.