सोलापूर : पोलिस महासंचालक कार्यालयाकडून सोलापूर ग्रामीण पोलिसांचे इन्स्पेक्शन झाल्यानंतर दुस-याच दिवशी मोहोळ, मंगळवेढा व सोलापूर तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन धाब्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक ंिहमत जाधव व गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी धाडी टाकल्या.
निरीक्षक अनिल सनगल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलिस हवालदार नारायण गोलेकर, प्रकाश कारटकर, धनाजी गाडे, अक्षय दळवी, अक्षय डोंगरे, समीर शेख या पथकाने मंगळवेढ्यातील आंधळगाव शिवारातील धाब्यावर छापा टाकला. सात हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी सलीम रमजान इनामदार (रा. आंधळगाव, ता. मंगळवेढा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तर मोहोळ हद्दीतील हिवरे पाटीजवळ देशी-विदेशी दारू विकणा-या व्यक्तीकडून सहायक फौजदार नीलकंठ जाधवर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार सर्जेराव बोबडे, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंडे या पथकाने कारवाई केली.
तेथून सहा हजार ६० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. तर सहायक फौजदार शिवाजी घोळवे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार बापू शिंदे, पोलिस नाईक लालंिसग राठोड, यश देवकते, सुरज रामगुडे या पथकाने वडजी तांडा परिसरात कारवाई केली. कैलास हुन्नाप्पा पवार हा पोलिसांना पाहून फरार झाला. तर सदाशिव दादू सावंत याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (ता. २५) दुपारच्या वेळेत मंगळवेढा, मोहोळ व तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत पथके पाठविली. त्या परिसरातील धाब्यांवर धाडी टाकून तेथून अवैधरीत्या विक्री होणारा मद्यसाठा जप्त केला. विशेष बाब म्हणजे, संबंधित तालुक्यातील पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस अधिका-यांनाच त्याबद्दल काही माहिती नव्हते. धाब्यांवर राजरोसपणे अवैधरीत्या मद्यविक्री सुरू असल्याची बाब राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईतून यापूर्वीच स्पष्ट झाली आहे. त्यानंतर आता ग्रामीण पोलिस कारवाई करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाला कारवाईतून सातत्यााने अवैध दारू सापडते. मग, ग्रामीण पोलिसांना का सापडत नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. त्यानंतर आता ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा पाश आवळला आहे.