सांगोला : गस्तीवरील पोलीस पथकाने आहे. दुस-या दिवशीही चोरून वाळू वाहतूक करताना छापा टाकून तीन ब्रास वाळूसह १० लाखांचा टिपर पकडला. ४ जुलैरोजी मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास सांगोला तालुक्यात मेथवडे फाटा येथे ही कारवाई केली. याबाबत पोलिस नाईक सुनील मोरे यांनी फिर्याद दिली असून आरोपी सुरेश ज्ञानेश्वर गायकवाड (रा. गुरसाळे, ता. पंढरपूर)याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला.
सांगोला पोलिस ठाणे हद्दीत अवैधरित्या वाळू उपसा करून चोरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील यांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुनील मोरे, राहुल देवकते, राहुल कोरे, पोलिस कॉन्स्टेबल धुळा चोरमुले यांचे पथक सोमवारी मध्यरात्री सांगोला पंढरपूर रस्त्यावर गस्त घालत होते.
त्यांना मेथवडे फाट्यावर टिपर अवैध वाळू भरून उभा असल्याची माहिती मिळाली. या पोलीस पथकाने छापा टाकून टिपरची तपासणी केली. टिपरच्या हौद्यात तीन ब्रास वाळू दिसून आली. यावेळी पोलिसांनी (एम.एच. १३/ ए.एक्स. २५३५) या टिपरसह १८ हजारांची तीन ब्रास वाळू असा १० लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.