26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeसोलापूरडिसले गुरुजींची संशोधन रजा मंजूर करण्याचे आदेश

डिसले गुरुजींची संशोधन रजा मंजूर करण्याचे आदेश

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकाचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ मिळविलेले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडी (ता. माढा) येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितंसिह डिसले यांनी अध्ययनासाठी मागितलेली प्रदीर्घ रजा प्रलंबित ठेवण्यात आली होती. या प्रकारामुळे सोशल मीडियावरून तसंच सामाजिक, राजकीय वर्तुळातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या प्रकरणात अखेर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आता लक्ष घातलं असून रजा मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याविषयीची माहिती दिली असून डिसले गुरुजींच्या संशोधन रजेचा अर्ज मंजूर करण्याचे निर्देश सोलापूरच्या मुख्य कार्यकारी अधिका-यांना देण्यात आले आहेत. आपल्या ट्वीटमध्ये वर्षा गायकवाड म्हणतात, सोलापूरच्या परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजित डिसले यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे.

रणजित डिसले यांनी अमेरिकेत जाऊन पीएच. डी करण्यासाठी जि. प. प्राथमिक शिक्षण विभागात गेल्या २१ डिसेंबर रोजी अध्ययन रजेचा अर्ज दिला आहे. डिसले यांनी यासंदर्भात जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन अध्ययन रजेबाबतची अडचण सांगितली. त्यावर स्वामी यांनी डिसले यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांना भेटण्यास सांगितले. त्यानुसार डिसले यांनी शिक्षणाधिका-यांची भेट घेऊन अध्ययन रजेची परवानगी मागितली. तेव्हा अध्ययन रजेचा अर्ज विहित नमुन्यात असणे गरजेचे असल्याचे सांगत शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी तुम्ही अमेरिकेत पीएच. डी करण्यासाठी गेल्यावर शाळेचे काय करणार, असा सवाल केला. तुमच्या या उपक्रमामुळे येथील अध्यापनाच्या मूळ कामाचे काय, अशी विचारणा करत एवढी प्रदीर्घ रजा शक्य नाही. त्यामुळे यासाठी तुम्हीच पर्याय सुचवा, असे शिक्षणाधिका-यांनी फर्मावले.

गेल्या तीन वर्षांत डिसले यांनी जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी आणि स्वत:च्या परितेवाडी शाळेसाठी काय योगदान दिले, हे पडताळून पाहण्यासाठी त्यांच्या सेवेची फाइल सादर करण्यास शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी गटशिक्षण अधिका-यांना सांगितले. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळविला, ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. परंतु त्यांच्या या उल्लेखनीय कर्तृत्वाचा परितेवाडी जिल्हा परिषद शाळेला किती उपयोग झाला, हे तपासावे लागेल, असे डॉ. लोहार यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या