27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeसोलापूरताडी विक्रीवरून सोलापुरात महाभारत

ताडी विक्रीवरून सोलापुरात महाभारत

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर शहर हे मोठ्या प्रमाणावर कामगार वस्ती असलेले श्रमिकांचे शहर म्हणून ओळखले जाते. यंत्रमाग, विडी कामगारांची मोठी संख्या शहरात आहे. त्यामुळे कामगारवर्गात लोकप्रिय असलेल्या फ्रूट बिअर, ताडी आदी पेयांची मोठी विक्री पूर्व भागासह श्रमिक वस्ती असलेल्या परिसरात होते. मात्र नैसर्गिक ताडीच्या नावाखाली रसायनमिश्रीत ताडी विक्री होत असल्याने सोलापुरात अनेकांना जीवाला मुकावे लागले. अखेर या रसायनमिश्रीत ताडीच्या विरोधात लोकप्रतिनिधी एकवटले आणि मोर्चे, आंदोलनानंतर सोलापुरातील रसायनमिश्रीत ताडी विक्री थांबली ही घटना २०१७ मधील आहे.

सोलापूर जिल्ह्यात ताडीची झाडेच नसल्याने २०१७ मध्ये शहरातील सर्व शासनमान्य ताडीची दुकाने बंद करण्यात आली होती. दरम्यान शासनाने नवीन ताडी धोरण स्वीकारले. त्यातील मार्गदर्शक तत्वानुसार ताडी विक्री केंद्रांचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला. राज्य उत्पादन शुल्क खात्याने केलेल्या सर्वेक्षणात सोलापूर जिल्ह्यात तब्बल ३८ हजार ३८३ ताडझाडे असल्याच्या नोंदी झाल्या. ८०० झाडांमागे एक दुकान या समीकरणानुसार शहरात ३२ दुकानांना परवाने देण्यात आले. मात्र या ताडी दुकानांना जनतेतून व लोकप्रतिनिधींकडून तीव्र विरोध होत आहे. दत्तनगर, भावनाऋषी पेठ, अशोक चौक, जुने विडी घरकुल परिसरात नव्या ताडी विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. शासनमान्य ताडी विक्री दुकानांमधून रासायनिक ताडी विक्री होत असल्याची बाब २०१७ मध्ये निदर्शनास आली. ताडीमध्ये ‘क्लोरल हायड्रेट’चे घटक रासायनिक तपासणीत आढळून आले होते. त्यावेळीही शहर जिल्ह्यात ३२ हजार ताडीची झाडे असल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या दप्तरी होती. आता चार वर्षात पुन्हा ३८ हजार ताडी उत्पादनक्षम झाडे कुठून व कशी आली हा संशोधनाचा विषय आहे. ताडीचे एक झाड एक वर्षाआड फक्त १५० लिटर ताडी उत्पादन देते मग ३२ ताडीविक्री दुकानांना पुरेल एवढी ताडी उपलब्ध आहे का? हा यक्षप्रश्न आहे.

श्रमिकांची वस्ती असलेल्या परिसरात नवीन ताडी विक्री दुकानांना पुन्हा परवानगी देण्यात आली आहे. अशोक चौक, शास्त्रीनगर, माधवनगर, सुनीलनगर, गांधीनगर, शांती चौक, बेगम पेठ, चिंतलवार वस्ती या भागात पूर्वी शासनमान्यताडी दुकाने होती. ‘क्लोरल हायड्रेट’ या रासायनिक घटकांपासून त्यांचीनिर्मिती व्हायची. त्यावेळीही उत्पादन शुल्क खात्याच्या दातरी हजारो ताडझाडांची नोंद होती मात्र प्रत्यक्षात ती झाडे अस्तित्वातच नव्हती.

२०१७ मध्ये ताडीचे बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधी आक्रमक झाले. जनता आणि लोकप्रतिनिधींच्या विरोधानंतर ताडी दुकाने बंद झाली. राज्य शासनाने नवीन धोरणानुसार ताडीचे ‘पाम वाईन’ नावाने मार्केटिंग केले आहे मात्र ‘पाम वाईन’ नाव असले तरी विक्री ताडीचीच होणार आहे. शहरात एकही ताडी विक्री दुकान चालू देणार नाही, अशी भूमिका आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे.तर ‘ताडी’ हे नैसर्गिक पेय असून शासनमान्य ताडी विक्री व्यवसायातून कोणालाही कसलाच धोका झालेला नाही आणि होणार नाही.

१९९० पासून सोलापूरमधील शासनमान्य ताडी विक्री दुकानात क्लोरल हायड्रेट पदार्थ मिसळल्याची नोंद नाही किंवा शासनमान्य ताडी विक्री दुकानातून ताडी पिवून कोणाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही, असा दावा शासनमान्य ताडी विक्री दुकानदार संघाने केला आहे. दुसरीकडे सोलापूर शहरात ई लिलाव पद्धतीने ३२ ताडी विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. शहर परिसरात मुबलक ताड झाडे नाहीत त्यामुळे या दुकानातून कृत्रिम ताडीच विकली जाणार आहे हे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असूनया ताडी विक्री दुकानांचे परवाने रद्द करण्याची मागणी पद्मशाली युवक संघटनेने
केली आहे. ताडी विक्री वरून रणकंदन सुरु असून ताडी दुकानांना तीव्र विरोध होत
आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या