सोलापूर : मुलाचे लग्न जमवण्यासाठी पूजा करावी लागेल असे सांगत एका महिलेचे साठ हजारांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले. त्याच्या ताब्यातून सोन्याचे गंठण व पंधरा हजारांचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हुसैनसाब मखदुमसाब नदाफ (मूळ रा. तेलंगणा, सध्या रा. धोत्री गोकुल सहकारी साखर कारखान्याजवळील वीटभट्टीवर) याला दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या मुलाचे होत नसल्याने त्या याबाबत आपल्या पतीशी बोलत असताना, आरोपी हुसेनसाब नदाफने फिर्यादीना तुमच्यावर करणी केली असून अडचणी दूर करण्यासाठी मी सांगतो त्या
पद्धतीने पूजा करावी लागेल असे सांगत मोबाइल नंबर दिले. फिर्यादींनी आरोपींच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यास पूजेसाठी राहते घरी बोलावले. त्यावेळी पुजेसाठी हुसेनसाव नदाफ याला १५ हजार रुपये दिले. दुसऱ्या दिवशी पुन्हा आरोपीने फिर्यादी यांना याहून मोठी पूजा करावी लागेल. त्यासाठी तुम्ही वापरलेला सोन्याचे दागिने हवे असे म्हणत फिर्यादीकडून गंठण घेतले. त्यानंतर आरोपीचा संपर्क झाला नाही. याप्रकरणी फिर्यादी यांनी एमआयडीसी पोलिस ठाणे येथे फिर्याद दिली.
या प्रकरणी तपास करताना पोसई विक्रम रजपूत गुप्त माहितीदाराने व तांत्रिक माहितीच्या आधारे संशयित आरोपी नई जिंदगी येथील शांती चौक येथे एक इसम फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. शिवाय सोन्याचे गंठण दक्षिण सोलापुरातील धोत्री येथील त्या मावशीच्या घराच्या शेजारी असणाऱ्या वीटभट्टीवर ठेवले असल्याचे सांगितले. त्यावरून निवेदन पंचनामा करून मौजे धोत्री येथे जाऊन सोन्याचे गंठण हस्तगत करण्यात आले आहे.
ही कारवाई स. पोलिस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक, राजन माने, पोनि तानाजी दराडे, सपोनि नितीन पेटकर, पोसई विक्रम रजपूत, पोहेकॉ राकेश पाटील, पोहेकॉ सचिन भांगे, पोना मंगेश गायकवाड, अयाज बागलकोटे, शैलेश स्वामी, काशीनाथ वाघे, शंकर जाधव, बाळगी, यादव, अश्रुभान दुधाळ, सूरज पवार यांनी केली.