22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeसोलापूरदहा डिसेंबरनंतर वाळू लिलाव प्रक्रिया राबविणार

दहा डिसेंबरनंतर वाळू लिलाव प्रक्रिया राबविणार

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी / सोलापूर :
राष्ट्रीय हरित लवाद व उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिल्ह्यातील वाळू लिलाव थांबले होते. मागील वर्षी लिलाव झाले पण ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने लिलावाची प्रक्रिया होऊ शकली नाही. २९ नोव्हेंबर रोजी पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील ९ ठिकाणचे वाळू लिलाव करण्यास मंजुरी दिली असून, यातून प्रशासनाला अंदाजे ५० कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. १० डिसेंबरनंतर वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिली.

राष्ट्रीय हरित लवादाने नदीपात्रात पाणी असताना वाळू उपसा करू नये, असे आदेश दिले होते. यामुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यात वाळू लिलाव करण्यावर बंदी होती. मात्र तीन वर्षानंतर अखेर पर्यावरण समितीने वाळू लिलावास हिरवा कंदील दाखविला आहे. यामुळे यंदा जिल्ह्यातील शासकीय, खासगी बांधकामांना मुबलक प्रमाणात वाळू उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

शासनाने वाळू लिलावाची मुदत तीन ते पाच वर्षासाठी करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी एक वर्ष मुदत होती. पण प्रशासनाने ९ ठेक्यांची मुदत एक वर्ष ठेवणार की दोन वर्ष याचा निर्णय अद्याप झाला नाही. दोन वर्षासाठी लिलाव करण्याबाबतचा प्रस्ताव आहे. याबाबत लिलावाची प्रक्रिया सुरू केल्यानंतरच कालावधी निश्चित केला जाणार आहे.
मोहोळ व मंगळवेढा तालुक्यातील अर्धनारी, बठाण, घोडेश्वर, तामदर्डी, मिरी, तांडोर व सिद्धापूर या ठिकाणावरील वाळू साठ्यांचे प्रस्ताव शासनाच्या पर्यावरण समितीला सादर करण्यात आले होते.२९ नोव्हेंबर रोजी पर्यावरण समितीने वाळू लिलावास हिरवा कंदील दाखविला आहे. २१ दिवसात लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार असून नव्या वर्षात ठेकेदारांना वाळूचे ठेके ताब्यात देण्याचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या