37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeसोलापूरमाझं मत माझं आहे...ओळखायला शिका : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

माझं मत माझं आहे…ओळखायला शिका : कुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी/सोलापूर
आपली लोकशाही सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. माझं मत माझं आहे, हे ओळखून 18 वर्षांवरील प्रत्येक नागरिकाने कोणत्याही आणि कोणाच्याही आमिषाला बळी न पडता, प्रभावित न होता मतदान करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस यांनी केले.
विद्यापीठ परिसरात मुख्य निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि विद्यापीठ यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात डॉ. फडणवीस बोलत होत्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव शशिकांत मोकाशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, गिर्यारोहक आनंद बनसोडे, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार, एकमतचे आवृत्तीप्रमुख संजय् येऊलकर, जेष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे, अमृत चौगुले, डॉ. रविंद्र चिंचोळकर आदी उपस्थित होते.

डॉ. फडणवीस म्हणाल्या, घटनेमुळे प्रत्येकाला समानतेचा अधिकार मिळाला आहे. देशात 64 टक्के तरुण वर्ग आहे, यामुळे प्रत्येकांनी पाच व्यक्तींना मतदानाविषयी जागरूक करावे. प्रत्येक व्यक्ती कार्यालय बनून माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी. मतदान आणि मतदान कार्डापासून वंचित लोकांपर्यंत पोहोचून मतदान नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
आज लोकशाहीच्या राजाचा सन्मान होत आहे. कोरोना महामारी आणि लॉकडाऊन असताना मतदार नोंदणीचे उत्कृष्ठ काम झाले आहे. तृतीयपंथीय आणि इतर वंचित घटकांना त्यांचे मतदान कार्ड, रेशन कार्ड काढण्यासाठी मदत करण्याचे आवाहन न्यायाधीश मोकाशी यांनी केले.

यावेळी निरामय संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या सीमा किणीकर, ज्येष्ठ पत्रकार विजयकुमार पिसे यांनीही विचार व्यक्त केले.
नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप यावेळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. यामध्ये अमित बनसोडे, ओंकार पाटील, अक्षय खाडे, प्रतिक्षा डोंगरे, सुनील माळगे या नवमतदारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आली.

तृतीयपंथीयांना मतदानाचा प्रथमच अधिकार झाला प्राप्त तृतीयपंथीय 18 वर्षे झाले तरी त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्यांचे मतदान यादीत नाव नव्हते. मात्र निवडणूक कार्यालयाने सामाजिक संस्थांच्या मदतीने 128 तृतीयपंथीय मतदार शोधून काढले आहेत. आज प्रातिनिधीक स्वरूपात रोहित वाघमारे, विनायक पाटील, रेखा मोरे, सिद्धी जगताप आणि शंकर सलगर यांना मतदान कार्डाचे वाटप केले असल्याने प्रथमच त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांचा मतदारांसाठीचा संदेश दाखविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देण्यात आली. तसेच मी मतदार झालो….तुम्ही पण मतदार व्हा..मतदार यादीत नाव नोंद करा…सेल्फी स्टँडवर अनेकांनी सेल्फी घेतल्या. आभार प्रदर्शन तहसीलदार वाकडे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या