सोलापूर: मित्राला वापरण्यासाठी दिलेली दुचाकी परस्पर खासगी सावकाराकडे गहाण ठेवल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत फिर्यादी संतोष महादेव शिवशरण (वय ३०, रा. सम्राट चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर हरी तिवारी (रा. विजापूर) यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवशरण यांच्या ओळखीतील आरोपी सागर याने डिसेंबर २०२२ मध्ये त्यांची दुचाकी चार दिवसांकरिता फिरविण्यासाठी घेऊन जातो असे सांगून त्यांच्याकडून नेली. पण आठ दिवसांनी गाडी न दिल्याने फिर्यादी यांनी गाडीबाबत विचारणा केल्यानंतर दुचाकी आणून देतो असे सांगितले. पण त्यानंतर ही
आरोपी सागर याने फिर्यादी यांची दुचाकी परत न केल्याने फिर्यादी हे विजापूर येथे गेले. त्यावेळी सागर याने फिर्यादी यांची दुचाकी विजापूर येथील सावकार यांच्याकडे गहाणवट ठेवली आहे व परत देतो असे सांगितले. परंतु अद्यापपर्यंत फिर्यादी यांची दुचाकी परत न दिल्याने फिर्यादीच्या सहमतीशिवाय परस्पर अपहार केला आहे, अशी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून सागर तिवारी याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास हवालदार भोसले करीत आहेत.