प्रतिनिधी/मोहोळ
कर्नाटकातून पुण्याकडे मालट्रक मधून निघालेला गुटखा नॅशनल हायवे क्र ६५ वर मोहोळ – टेंभुर्णी या दरम्यान मोहोळपासून तीन किलोमीटर अंतरावर सोलापुरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने पकडला. त्यामधील 4 के स्टार लेबल असलेली सुमारे १५ लाख रुपयांची ८० पोती व ट्रक असा एकूण सुमारे ५५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही घटना दिनांक २० जानेवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपनिरीक्षक धनंजय पोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातून मालट्रक क्रमांक (के.ए.३९. ए. १५१८) हा मालट्रक 4के स्टार नावाचे लेबल असलेला गुटखा घेऊन कर्नाटकातून मोहोळ मार्गे पुण्याकडे निघाल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने मोहोळ पासून तीन किलोमीटर अंतरावर टेंभुर्णीकडे जाणा-या रस्त्यावर शेर ए पंजाब धाब्यासमोर सदर क्रमांकाचा मालट्रक अडवून चौकशी केली असता चालकाने पहिल्यांदा उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलीस पथकाने याबाबत अधिक चौकशी केली असता त्या मालट्रकमध्ये 4 के स्टार गुटखा भरलेल्या ८० पिशव्या आढळून आल्या. या गुटख्याचीकिंमत १४ लाख ९७ हजार ६०० रु असून मालट्रकसह सुमारे ५४ लाख ९७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर बाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्रशांत कुचेकर यांनी मोहोळ पोलिसात दि २१ रोजी फिर्याद दिली असून याप्रकरणी सलामोद्दीन गौसोद्दीन चिमणचौक (रा.संत,ता.कलबुर्गी), बलवंत हनुमंत ठेबी (रा. गांधीनगर, तायमडगी ता. हुमनाबाद ) दोन्ही कर्नाटक , राजू सुभाष पाटील (रा. वाडा, जि. पालघर) व मूळ गाडीमालक सय्यद मेहबूब अशा चौघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस फौजदार नीलकंठ जाधवर, हरिदास पांढरे, अमोल गावडे, सचिन मागाडे, राहुल देवकते यांच्या पथकाने केली . या कारवाईमध्ये स्थानिक मोहोळ पोलिसांचा थेट सहभाग होता कि नव्हता याबाबत महिती मिळू शकली नाही . मालट्रक मधून गुटखा घेऊन जात असताना त्याबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून मालट्रकच्या पाठीमागील भागात पंधरा ते वीस पशुखाद्याची पोती भरण्यात आली होती. जेणेकरून बाहेरून पाहणा-यांना संशय येऊ नये.