सोलापूर : शहरातील बहुचर्चित ५४ मीटर रस्त्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. या रस्त्यावरील अवंतीनगर येथे होणा-या रेल्वे बोगद्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. बोगद्याच्या कामासाठी रेल्वे लवकरच शटडाऊन घेण्यात येणार असून, त्यासंदर्भातील प्रस्ताव रेल्वेने मुंबईला पाठविला असल्याची माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली.
जुना पुना नाका ते सीएनएस हॉस्पिटल दरम्यानच्या ५४ मीटर रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. यादरम्यान रेल्वे लाइन असल्याने रेल्वे बोगदा तयार करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाने सन २०१८ मध्ये १८ कोटी रुपये रेल्वे प्रशासनाकडे भरले होते
. त्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून हे काम करण्यात आले नाही. दरम्यान, महापालिका आयुक्त शीतल तेली . उगले यांनी यासंदर्भात सातत्याने सोलापूर विभागीय व्यवस्थापक यांच्याशी पाठपुरावा केला. या रस्त्याच्या कामासाठी शासनाने कर्ज काढा, असेही महापालिकेला सांगितले होते.