तालुका प्रतिनिधी / इंदापूर
राज्यातील विविध भागातील पर्यावरण पूरक पर्यटन ( इकोटुरिझम ) अंतर्गत कामांना गती देवून वन विभागातील २ हजार ७६२ विविध रिक्त पदभरती संदर्भात वन विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.
मुंबई मंत्रालयातील राज्यमंत्री भरणे यांच्या दालनात वन विभातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावा बाबत अधिकारी व सचिवांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटूरिझमचे प्रस्ताव वन विभागाकडे आले आहेत. या प्रस्तावासाठी निधीची आवश्यकता आहे. ही बाब लक्षात घेता. याबाबत वित्त विभागाकडे मागणी विभागाने करावी. नांदेड जिल्ह्यातील टिटवी निसर्ग पर्यटन केंद्र, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी, अकोला जिल्ह्यातील कुटासा, कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वडगांव, पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे वेल्हा येथील श्री भवानीमाता परिसर, पुणे जिल्ह्यातील शंभु महादेव हरेश्वर मंदिर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिरोंभा येथील अप्पर वर्धा धरण, लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील संजीवनी बेट, पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्हाई, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, वसई येथील तुंगारेश्वर देवस्थान या प्रलंबित प्रस्तावांबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाही बाबत आढावा घेण्यात आला.
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वनसरंक्षक व सर्व्हेक्षक संवर्गातील रिक्त पदे, पशुसंवर्धन सहायक आयुक्त, उपायुक्त गट – अ पदभरती, वनपाल संवर्गातून वनक्षेत्रपाल संवर्गातील पदोन्नती देणे, शाखा अभियंता या संवर्गातून उपवनअभियंता या संवर्गात पदोन्नती देणे, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन अधिका-यांच्या विभागीय परीक्षा नियमात सुधारणा करणे, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन विभागात जलद कृती दल स्थापन करण्याच्या प्रस्तावांची सध्यस्थिती, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाची राज्यस्तरीय ज्येष्ठता सूची, वनसंरक्षणाचे काम करताना मृत्यू झालेले अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्याबाबत सूचना केले.
चौकट : राज्यमंत्री भरणे यांनी विविध खात्यांना दिला न्याय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची पुर्वी पासूनच कोणत्याही कामांची व निर्णय घेण्याची क्षमता प्रचंड आहे. त्यांची प्रत्येक गोष्टीकडे वेगळ्या अँगलने पाहण्याची सकारात्मक दूरदृष्टी मुळे अचूक निर्णय होतात. विविध खात्यांच्या राज्यमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्या पासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध खात्यांना तसेच वन विभागाच्या खात्याला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली न्याय देण्याची भूमिका राज्यमंत्री भरणे पार पाडत आहेत.