सोलापूर : कारचे थकीत हप्ते न भरल्याने गाडी जप्त करण्यासाठी गेलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वसुली अधिकाऱ्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत विशाल अशोक जेटीथोर (वय ३६, रा. विष्णू मिल, डोणगाव रोड) यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून वृषाली विल्सन भिटे (रा. आयोध्यानगर, विजापूर रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी भिटे हिच्या कारचे हप्ते न भरल्याने विशाल हे त्यांची कार जप्त करण्यासाठी त्यांच्या घरी गेले. त्यावेळी तू माझ्या घरी कसा आला, तुला दगडाने ठेचून मारते, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी फिर्यादीच्या गाडीवरील चक्र चिन्ह दिसल्याने जास्त चिडून त्यांनी फिर्यादी विशाल यांना जातीवाचक शिवीगाळ करत तुझी लायकी आहे का? माझ्या घरी येण्याची, असे म्हणत त्यांना शिवीगाळ केली,
अशा आशयाची फिर्याद जेटीथोर यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून वृषाली भिटेवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास सहायक पोलीस आयुक्त माधव रेड्डी हे करत आहेत.