सोलापूर : लग्नामध्ये मानपान केला नाही. माहेरहून व्यवसायासाठी पाच लाख रुपये आण, नाही तर पतीचं दुसरं लग्न लावून देण्याची धमकी पतीसह सासरच्या लोकांनी देत छळ केल्याची तक्रार स्रेहा विठोबा घटकांबळे या विवाहितेने विजापूर नाका पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिस सूत्रांनुसार फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादी विवाहिता स्रेहा घटकांबळे ही विजापूर रोड, सुशीलनगर येथे मूळची राहणार आहे पुण्याच्या सुसगाव येथील विठोबा घटकांबळे यांच्याशी तिचे ४ ऑगस्ट २०२१ रोजी लग्न झाले आहे. लग्नानंतरच्या काही दिवसांनी पती विठोबा यांच्यासह सासू महादेवी घटकांबळे, दीर अंबादास घटकांबळे
(सुसगाव, बाणेर, पुणे) आणि नणंद रेणुका देवानंद गायकवाड व तिचा पती देवानंद गायकवाड (सुतारवाडी, पुणे) यांनी मानपानावरून मानसिक छळ देण्यास सुरुवात केली. माहेरहून व्यवसायासाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावला. पैसे आणले नाहीतर पती विठोबा यांचे दुसरे लग्न लावून देतो, अशी धमकी दिली. नांदविण्यास नकार दिला. विवाहिता सध्या माहेरी सोलापुरात आहे. याप्रकरणी फिर्यादीनुसार पती, सासू, दीर, नणंद आणि तिचा पती अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.