राजेश शिंदे/मोहोळ
यापूर्वी बुडत्याला काडीचा आधार अशी म्हण प्रचलित असे मात्र आता महावितरण वसुलीमधील भ्रष्टाचाराला बचत गटाचा आधार अशी नवीन म्हण रूढ होताना दिसत आहे. कारण महावितरणकडे चारीबाजूने कोंडी झाल्याने किडूकमिडूक गहाण टाकून वीज बिल भरणा करणा-या शेतक-यांनी लाईनमन आणि कर्मचा-यांकडे जमा केले. या वीज बिलातील बहुतांश रक्कम चक्क काही बचतगटांनी संकलित केली असे दाखवून त्या बचत गटांच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या कमिशनवर डल्ला मारण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यात घडल्याची लेखी तक्रार चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते हनुमंत चौधरी यांनी केल्यामुळे मोहोळसह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत माहिती अशी की वीज महावितरण कंपनीचे शेतक-याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असून ही थकबाकी वसूल करण्यासाठी शेतक-यांचा विजेचा डी पी सोडवणे, विज पुरवठा बंद करणे, डी पी नादुरुस्त झाल्यास तो बदलून न देणे, मालमत्ता जप्तीची धमकी देणे अशा अनेक गोष्टी करून शेतक-यांकडून मोठ्या प्रमाणात वीज बिलाची रक्कम जमा करण्यात आली. विज बिल भरून घेण्यासाठी बचत गटांकडून देखील मदत घेऊन बचत गटांना महावितरणकडून घसघशीत कमिशन जाहीर करण्यात आले.
त्यामुळे या संधीचे सोने करण्यासाठी रातोरात शेकडो बचत गटांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये महावितरणमध्ये कार्यरत असणारे काही कर्मचा-याशी अप्रत्यक्ष लागेबांधे असलेल्या लोकांनी बचत गट सुरू केले. वास्तविक पाहता गावपातळीवर सर्व शेतकरी बांधव ज्या ठिकाणी ट्रांसफार्मर सोडवला जातो त्या यंत्रणेच्या संपर्कात राहून वीज बील संकलित करून लाख रुपयांची रक्कम सदर लाईनमन कडे अथवा महावितरणच्या कर्मचा-याकडे जमा करत असत. महावितरणकडे सेवा बजावत असल्यामुळे सदर कर्मचा-यांनी ती रक्कम थेट कार्यालयाच्या कोषागारात अथवा महावितरणच्या बँक अकाउंटमध्ये जमा करून तशी नोंद करणे गरजेचे होते. मात्र बचत गटांना घसघशीत कमिशन असल्यामुळे काही कर्मचा-यांनी आपल्या ओळखीच्या बचत गटाकडे ती रक्कम सुपूर्द करून सदरची वसुली बचत गटाने केली आहे असा आभास निर्माण केला.
त्यामुळे महावितरणच्या संपर्क यंत्रणेने वसूल केलेली रक्कम बचत गटाच्या नावे जमा करून सदरच्या कमिशनमध्ये काही कर्मचा-यांनी हात धुऊन घेतले. यामुळे लाखो रुपयांचे कमिशन संकलित बिला मधून महावितरणला द्यावे लागून मोठा तोटा सहन करावा लागला आहे. आहेत याला काही बचतगट चालक देखील जबाबदार असल्यामुळे या सामूहिक भ्रष्टाचाराची चौकशीची मागणी हनुमंत चौधरी यांनी केल्यामुळे मोहोळ तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.