बार्शी : शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जेवण करून माढा रोडवर शतपावली करण्यासाठी निघालेल्या निवृत्त शाखाधिकारी अभिमन्यू अर्जुन मोटे (वय ६३ रा . वाळूज, ता मोहोळ, सध्या रा. छत्रपती शिवाजीनगर, वैराग) यांना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. सोलापूर येथे उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून सेवानिवृत्त झालेले अभिमन्यू मोटे हे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास वैराग येथील माढा रोडलगत फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना एका दुचाकीने जोराची
धडक दिली. यावेळी त्यांना जखमी अवस्थेत उत्कर्ष डुरे, नगरसेवक दादा काळोखे, भैय्या ंिनबाळकर, प्रसाद कांबळे, चैतन्य यादव यांनी वैराग येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर जखमीच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी (दि. १३) अकरा वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांनी डीसीसी बँकेत ३५ वर्षे सेवा केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी वाळूज येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.