सोलापूर – सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहरातील भारती विद्यापीठ शाळेजवळील दत्त मंदिर, सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, आसरा पुलाखालील दत्त मंदिर, दंडवते महाराज मठ यांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर आणि एकमुखी दत्त मंदिर येथे ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार करण्यात आला. दत्त चौक येथे लावण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाच्या ठिकाणी प्रथमोपचार कक्षही उभारण्यात आला होता. या कक्षावर प्रथमोपचार प्रशिक्षणाच्या संदर्भातील ग्रंथ, प्रथमोपचार पेटीमध्ये कोणते साहित्य असावे याविषयी माहिती देण्यात येत होती.
या प्रदर्शन कक्षांवर दत्तगुरूंच्या उपासनेविषयीच्या ग्रंथांसह सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, धर्माचरण, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्वरप्राप्तीसाठी कला, आपत्काळात जीवित रहाण्यासाठी उपाय, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ, तसेच सात्त्विक उत्पादनांचे कक्षही उभारण्यात आले होते. दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरच्या अखेरपासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी व्याख्याने, सामूहिक नामजप, फलक प्रसिध्दी, सोशल मिडिया आदी माध्यमातूनही लोकांचे प्रबोधन करण्यात आले.