मोहोळ : बांधकामावर झोपायला गेल्याची संधी साधून चोरट्यांनी दरवाजा तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मोहोळ तालुक्यात येवती येथे गुरुवार, २३ जून रोजी मध्यरात्री घडली.
याबाबत इंदुमती औदुंबर हारगुडे ( वय ४०) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मोहोळ तालुक्यात येवती येथे इंदुमती हारगुडे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचे सर्व साहित्य उघड्यावर असल्याने, त्या आणि त्यांचे कुटुंबीय रात्री बांधकामावर झोपण्यास गेले होते.
दरम्यान, गुरुवारी रात्री नेहमीप्रमाणे जुन्या घरी जेवण उरकून घराला कुलूप लावून बांधकामावर मुक्कामी गेल्या. पहाटे ५.३० वाजता त्या जुन्या घराकडे आल्या असता, त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. आत डोकावले असता घरातील लोखंडी कपाट उघडलेले आढळले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळविल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी २७.५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे सहा प्रकारचे दागिने पळविले गंठन, बोरमाळ, कानातील रिंगा, फुले झुबे, रिंगा, अंगठी आणि रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण १ लाख ३४ हजार ७५० रुपयांचा ऐवज पळविल्याची फिर्याद त्यांनी मोहोळ पोलिसात दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे हे करीत आहेत.