अक्कलकोट : पैसे दामदुप्पट करून देतो म्हणून अक्कलकोट तालुक्यातील एका सुशिक्षित तरुणास तब्बल १५ लाख रूपयास गंडा घातला आहे. हा प्रकार ऑनलाइनच्या माध्यमातून घडला आहे. ही घटना दि. १३ ते १८ जानेवारी २०२३ या कालावधीत घडली.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी शेखर शामराया भडोळे (रा. सलगर, ता. अक्कलकोट) हा हैदराबाद येथील एका नामवंत सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीस आहे. दोन वर्षांपासून वर्क फ्रॉम होम सुरू आहे. दि. १३ जानेवारी २०२३ रोजी रात्री साडेअकरा वाजता सर्व काम संपवून ऑनलाइन व्हिडीओ पाहत होते. तेव्हा चिट फंड खाते ओपन झाले. त्यामध्ये १० हजार रुपये गुंतवा तत्काळ ३० हजार रुपये मिळेल, असे सांगण्यात आले. तेव्हा शेखर याने या दिवशी संबंधित व्यक्तीच्या मोबाइल नंबरवर संपर्क साधून चर्चा केली. त्यावेळी फिर्यादी याने अॅपवरून स्वतःच्या खात्यावरील ८० हजार रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. त्यानंतर
दुसऱ्या दिवशी म्हणजेच दि.१४ जानेवारी रोजी ९९ हजार ९९९ रुपये फिर्यादीच्या खात्यावर जमा झाल्याचा मेसेज आला. यामुळे शेखर याने पुन्हा १५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर कॉल करून संबंधितास फोन करून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र मोबाइल बंद झाला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.