मोहोळ : मोहोळ पंचायत समितीतील पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंत्यासह दोन सहाय्यक कर्मचाऱ्यांना ५००/- रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची खळबळजनक घटना पंचायत समिती आवारात घडली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की मौजे हिंगणी निपाणी,ता.मोहोळ येथील गावाला समाज कल्याण विभाग जि.प. सोलापूरच्या वतीने अनुसुचित जाती वस्तीला पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याची योजना मंजूर करण्यात आली होती. याचा पाठपुरावा सरपंचांनी केला असता तांत्रीक मंजुरी मिळवून देण्यासाठी आणि लवकरात लवकर मान्यता देण्यासाठी व काम करण्यासाठी संबंधित शाखा अभियंता विधाते याने वैधकर याच्यासाठी रु. २०० आणि फुलानुवार याच्यासाठी रु. ३०० असे एकूण रु.५००/- इतकी मागणी केली.
याला या दोघांनीही संमती दिली. परंतु सदर सरपंचाच्या मुलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूरकडे तक्रार दाखल केली. दि. २२ व २३ जून रोजी खात्याने सापळा लावला असता पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता हेमंत राजाभाऊ विधाते यांस ५०० रुपयांची लाच घेताना त्याच्याच कार्यालयामध्ये रंगेहाथ पकडले. त्याचबरोबर इतर दोन आरोपी सिद्रामप्पा मल्लिकार्जुन वैधकर,कनिष्ठ सहाय्यक व गंगाधर हणमल्लु फुलानुवार, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी लोकसेवक लाच प्रतिबंधक कायद्यान्वये मोहोळ पोलिस ठाण्यात सविस्तर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि उमाकांत महाडिक, पोअं सोनवणे, घाडगे, सण्णके यांच्या पथकाने ही कारवाई केली. नुकताच पीआरसी कमिटीचा दौरा झाला होता, त्यामध्ये पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तुवणुकीबद्दल आणि सर्वसामान्य जनतेच्या कामाला लोंबकळत ठेवण्याबद्दल तक्रारी बऱ्याच राजकीय पक्षांच्या कार्यकत्यांनी व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या.
तरीपण निगरगट्ट प्रशासनाला काहीच फरक पडत नसल्याची चर्चा नागरीकांमध्ये सुरु झाली आहे. आतातरी यापासून बोध घेऊन प्रशासनात फरक पडणार का ? आणि नवीनच आलेले गटविकास अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी धाडसी पाऊले उचलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.