अकलूज, दि. २८- सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने माळशिरस तालुक्यात सुमारे ५८० लोक बाधित झाले. तर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ३ हजार २०० लोक बाधित झाले असल्याची माहिती नुतन तहसिलदार जगदिश निंबाळकर यांनी अकलूज येथे पत्रकारांना दिली. सप्टेंबर महिन्यात माळशिरस तालुक्याच्या विविध भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ५८० लोक बाधित झाले. त्यांना ५ हजार रूपयांपैकी प्रत्येकी २ हजार ३०० रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले तर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुमारे ३ हजार २०० लोक बाधित झाले आहेत.
अद्याप त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. यातील बाधितांना १ कोटी ३२ लाख ७० हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. तर घरांची पडझड झालेल्या २८० लोकांना प्रत्येकी ६ हजार रूपये देण्याचे काम सुरू आहे. पिलीव येथील पुरामध्ये मयत झालेल्या व्यक्तीला सुमारे ४ लाख रूपये भरपाई देण्यात आली आहे. शेतीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी टिम तयार केल्या आहेत. माळशिरस तालुक्यात अंदाजे १६ ते १७ हजार हेक्टर जमिन पावसामुळे बाधित झाल्याचा अंदाज आहे. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त बाधित झालेल्या शेतकरयांना हेक्टरी १० हजार रूपये, फळबागेला २५ हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. बाधित क्षेत्राची मर्यादा २ हेक्टर पर्यंत आहे. माळशिरस तालुक्यात खळवे, वाघोली, वाफे गाव व बाभुळगांव या चार ठिकाणी वाळुचे पॉईंट सुरू करण्यासाठी तहसिल कार्यालयाकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. मंजुरी मिळताच याचे टेंडर काढण्यात येईल.
तर माळशिरस तालुक्यातून उपसा झालेल्या गौण खनिजाच्या माध्यमातून सुमारे ४ कोटी रूपयांचा महसुल गोळा झालेला आहे. ज्या खडी क्रशरकडे थकबाकी आहे अशांना नोटीसा काढलेल्या आहेत. जर बाकी तातडीने भरली नाही तर त्यांच्यावर बोजा चढवण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी तहसिलदार निंबाळकर यांनी दिला. त्याचबरोबर तालुक्यात महाराजस्त अभियाना मोठ्या प्रमाणावर राबवण्याचा मानस आहे. तालुक्यातील नागरीकांच्या अडी अडचणी व इतर माहिती त्यातून घेतली जाणार आहे. तहसिल कार्यालयाकडून सध्या सर्व प्रकारचे दाखले देण्याचे काम सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच रेशनकार्ड, आधार कार्ड, सातबारा दुरूस्तीसाठी तालुक्याच्या विविध भागांमध्ये कॅम्प घेण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर नागरीकांच्या अडअडचणी सोडवण्यासाठी थेट भेट अभियान सुरू करण्यात येणार असून मंडलनिहाय हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे तहसिलदार जगदिश निंबाळकर यांनी सांगितले.
परतीच्या पावसात वाहून गेलेल्या दादाराव चौधरी यांच्या कुटुंबाला तहसीलदार शेलारांची भेट