26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeसोलापूरसोलापूरात दोन कारच्या धडकेत ६ ठार

सोलापूरात दोन कारच्या धडकेत ६ ठार

एकमत ऑनलाईन

मोहोळ : सेलेरो कार व स्कॉर्पिओची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात सहाजण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवार दि. २३ मे रोजी मोहोळ तालुक्यातील पेनुर गावच्या शिवारात पंढरपूर पालखी मार्गावर घडली.

मोहोळ येथे तीन पिढ्यापासून वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या खान कुटुंबातील त्यांचा पुणे येथील इंजिनिअर मुलगा इरफान नुरखाँ खान वय ४०, त्याची पत्नी बेनजीर इरफान खान वय ३७ व मुलगी इनाया इरफान खान वय २ आणि त्या कुंटुंबाचे जावई डॉ. मुजाहिद इमाम आतार वय ३७, त्याची पत्नी डॉ. आफरीन मुजाहिद आतार वय २७ व त्यांचा मुलगा अराफत मुजाहिद आतार १० वर्षे (सर्व रा. मोहोळ) अशी मृतांची नावे आहेत. तर अरहान इरफान खान १० वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी ३५, मनिषा मोहन हुंडेकरी ३० वर्षे (दोघे रा. गादेगाव ता. पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसांत करण्यात आली आहे.

याबाबत मोहोळ पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, मोहोळ येथील खान व आतार कुटुंबीय उन्हाळी सुट्टीसाठी रत्नागिरी येथे गेले होते. रविवार २१ मे रोजी ते सेलेरो कारने (क्रमांक एमएच १३ डीटी ८७०१) मोहोळ कडे परतत होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान त्यांची कार पेनुर गावच्या शिवारातील माळी पाटी परिसरात आली होती. यावेळी मोहोळहून पंढरपूरकडे भरधाव वेगात निघालेल्या स्कॉर्पिओने (क्रमांक एम एच १३ डी.ई. १२४२) त्यांच्या कारला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये इरफान नुरखाँ खान वय ४०, बेनजीर इरफान खान ३७, मुजाहिद इमाम आतार ३७, आफरीन मुजाहिद आतार २७, इनाया इरफान खान २, अराफत मुजाहिद आतार १० वर्षे (सर्व रा. मोहोळ) हे सहा जण गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले. तर अरहान इरफान खान १० वर्षे (रा. मोहोळ), अनिल सुभाष हुंडेकरी ३५, मनिषा मोहन हुंडेकरी ३० वर्षे (गादेगाव) हे गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचा अक्षरशा चक्काचूर झाला. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वप्रथम जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवून दिले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी मोहाच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिले. सध्या जखमींवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एकाच कुटुंबावर काळाचा घाला
एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्देवी अंत आपल्या घराजवळ पोहोचतानाच झाल्यामुळे संपूर्ण मोहोळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

मृतांमध्ये २ डॉक्टर २ चिमुकले
मुजाहिद इमरान आतार व त्यांची पत्नी आफ्रीन मुजाहिद आतार हे दोघे डॉक्टर आहेत. या अपघातात त्यांच्या सह त्यांचा दहा वर्षांचा मुलगा अराफत मुजाहिद आतार व दोन वर्षीय भाची इनाया इरफान खान ठार झाले आहेत. घटनेचे वृत्त समजताच खान व आतार यांच्या नातेवाईकांनी तसेच शहरामधील नागरिकांनी मोहोळ ग्रामीण रुग्णालयासमोर एकच गर्दी केली होती.

हिंगोलीत पिकअप उलटून एक ठार
हिंगोली-सेनगाव मार्गावर रिधोरा पाटीजवळ पिकअप उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाल्याची घटना रविवारी (ता.२२) दुपारी घडली. विदर्भातील अंजनी बुद्रुक (ता.मेहकर) येथील काही जण पिकअप व्हॅनने रविवारी दुपारी कार्यक्रमासाठी नर्सी नामदेव येथे येत होते. त्यांचे पीकअप व्हॅन हिंगोली-सेनगाव मार्गावर रिधोरा पाटीजवळ आले असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला. या अपघातात एक जण ठार, तर सहा जण जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या