कुर्डुवाडी: ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून चार ऊस वाहतूकदारांना सहा मुकादमांनी ६८ लाख ४५ हजार रूपये घेऊन गंडवल्याचा प्रकार घडला असून याबाबत तिघा फिर्यादींनी कुईवाडी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यानंतर पोलिसांनी सहा मुकादमांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सूत्रांकडील माहितीनुसार गोरख शिवाजी गोरे (रा. सापटणे) यांनी प्रथम फिर्याद दिली आहे. गोरख आणि त्यांचा चुलत भाऊ योगेश भारत गोरे हे ऊस वाहतूकदार आहेत. त्यांना देविदास तुकाराम जाधव व विजय महादेव वारे (दोघे रा. चिंचोली काजळे ता. औसा) या दोन मुकादमांनी सन २०२०-२१ वर्षासाठी ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून २३ लाख ६० हजार रुपये घेतले.
दुसरे ऊस वाहतूकदार सचिन अरुण सातव (रा. महिसगाव, ता. माढा) यांनीही पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांना ऊसतोड मजूर पुरवतो म्हणून रावण भीमा जाधव व संजय भीमा जाधव (रा. हिराबोरी तांडा, ता. लोहा) या दोन मुकादमांनी सन २०२१-२२ करिता फिर्यादीकडून १६ लाख ५० हजार रूपये घेऊन फसवणूक केली आहे.
तिसरे ऊस वाहतूकदार नीलेश पोपट नरुटे (रा. महिसगाव, ता. माढा) यांना धर्मेंद्र जगन्नाथ बरडे व सुदाम साहेबराव गायकवाड (रा. कानडी खु ता. आष्टी) या दोन मुकादमांनी सन २०२२-२३ करिता उसतोड मजूर पुरवतो म्हणून फिर्यादीकडून २८ लाख ३५ हजारांची फसवणूक केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक गोपाळ पवार हे करत आहेत.