सोलापूर : जिल्ह्यातील काही भागांत टोळी निर्माण करून गुन्हे करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तीन टोळ्यांतील नऊ आरोपींवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हद्दपारीची कारवाई केली.
सांगोला पोलीस स्टेशन हद्दीतील अनिकेत बापूराव काळे, अक्षय विजय इंगोले, (दोघे रा. वज्राबादपेठ, सांगोला) यांच्यावर सांगोला तालुक्यात, तसेच परिसरात दहशत निर्माण केली. त्यांच्यावर मालाविषयक व शरीराविषयक गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामुळे त्यांना १ वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील शंकर ऊर्फ बिनू लिंगा भोसले कास अण्णा गोडसे महेश जिवाप्पा कोळी, भय्या उत्तम शिंदे (सर्व रा. आंबे, या आरोपींवर वाळूविषयक पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण व पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्याकरिता त्यांना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, माळशिरस व करमाळा या तालुक्यांतून १ वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
तसेच रविराज दिलीप मस्के ( रा. एखतपूर रोड, मस्के कॉलनी, सांगोला), अजिंक्य बिरुदेव माने (रा. धनगर गल्ली, सांगोला), लखन रामचंद्र चव्हाण (रा. सांगोला) यांना सोलापूर जिल्हा व सांगली जिल्ह्यातील जत व आटपाडी तालुक्यातून एक वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
तरी हद्दपार इसम हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ संबंधित पोलीस ठाण्यास व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले आहे.