सोलापूर : जानेवारी २०२३ मध्ये झालेल्या माघी यात्रेत भगर खाल्ल्यामुळे ८० वारकऱ्यांना विषबाधा होऊन उलट्या जुलाबाचा त्रास झाला होता. सर्वांना उपचारासाठी सरकारी दावाखन्यात दाखल केले होते. दरम्यान, अन्न व औषध प्रशासन भगर विकत घेतलेल्या दुकानातून भगर, तेल व अन्य पदार्थाचे नमुने घेतले होते. पुणे येथील प्रयोग शाळेत ते तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आला मात्र भगरीचे नमुने हे प्रमाणीत होते. अन्य दोन नमुन्यांचा अहवाल अद्याप आला नाही. चैत्री यात्रेत लोकांनी उपवासाचे पदार्थ घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी केले.
चैत्री यात्रेनिमित्त पंढरपुरात मोठ्या संख्येने वारकरी दाखल होतात. भागवत एकादशीनिमित्त उपवास धरतात. दरम्यान, फराळासाठी वापरण्यात येणारा भगर’ खरेदी करताना काळजी घ्या. दुकानदारांकडून घेतलेल्या फराळाचे बिल घ्या, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
चैत्री यात्रेदरम्यान कामदा स्मार्त एकादशी व भागवत एकादशी आल्या आहेत. संपूर्ण जिल्ह्यात भाविक एकादशी दिवशी उपवास धरतात. माघी यात्रेतील भगरीतून झालेली विषबाधा लक्षात घेता यंदा विक्री करणाऱ्या दुकानदारांवर लक्ष ठेवण्यात आले आहे. भगर व इतर पदार्थ खरेदी करताना नोंदणीकृत परवानाधारक दुकानदाराकडून खरेदी करावेत. पॅक . बंद असलेले भगर व उपवासाचे पदार्थ घ्यावेत. पॅकेटवरील उत्पादकाचा तपशील, बॅच नंबर तपासूनच खरेदी करावे. पॅकेटवर प्रक्रिया उद्योगात
भगरीचे उत्पादन केव्हा झाले, याचा तपशील असतो तो पाहून घ्यावा. भगरीवर बेस्ट बिफोर म्हणजे एक्सपायर डेट (अंतिम तारीख)पाहावी.भगरीचे सुटे पीठ खुल्या बाजारातून किंवा हातगाडीवरून घेऊ नये बाजारातून पॅकबंद भगर खरेदी केल्यावर ती स्वच्छ करून व धुवून त्याचे घरगुती पीठ तयार करावे.
सकाळी बनवलेली भगर संध्याकाळी, रात्री शिळी झाल्यानंतर तिचे सेवन करण्यात येऊ नये. भगर व इतर उपवासाचे अन्न पदार्थ बनविताना स्वच्छ वातावरणात तयार करावेत. ते तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करावा, असे आवाहन केले आहे .