सोलापूर : बार्शीतील पांगरी-शिराळा फटका फॅक्टरी स्फोट प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारखाना मालकांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मालक युसुफ मणियार आणि नाना पाटेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बार्शीतल्या पांगरी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४, ३३७, ३३८, २८५, २८६, ३४, भारतीय विस्फोटक अधिनियम १८८४ चे कलम पाच आणि नऊ ब प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारखाना मालक युसुफ मणियार आणि साथीदार नाना पाटेकर दोघेही अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान ज्या ठिकाणी स्फोट झाला तिथे कारखाना चालवण्यासाठी कोणताही परवाना नव्हता, ही बाब देखील फिर्यादमध्ये नमूद केल्या आहेत. सहाय्यक पोलिस फौजदार सतीश कोठावळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करताना फॅक्ट्रीमध्ये स्फोट झाला तिथल्या मजुरांच्या सुरक्षेची कुठलीही साधनं तिथं नसल्याचं म्हटलं आहे. शिवाय तिथले कामगार जे काम करत होते त्यांना त्या कामाबद्दल कुठलंही प्रशिक्षण देखील दिलं नव्हतं.
सोलापूर-पांगरी फटाका आग प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूर- फटाका कारखान्यात ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या कारखान्याला कोणताही परवाना नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवाय परवानगी दिलेली जागा सोडून दुसरीकडे कारखाना सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
काल दुपारच्या सुमारासम सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पांगरीमध्ये फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार महिला कामगारांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत काही कामगार गंभीर जखमी झाले आहेत. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना भीषण स्फोट झाला. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत शासनाकडून घोषित करण्यात आली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच राज्यात नाशिकमधील इगतपुरी आणि सोलापुरातील बार्शीतील या दोन्ही घटनांमध्ये काही कामगारांना जीव गमावावा लागला. या दोन्ही घटनांचे व्हीडीओ अजूनही सोशल मीडियावर व्हायरल होत असून ते भीषण आहेत.