सोलापूर : परीक्षेमुळे मनावर आलेला तणाव करण्यासाठी मित्रांसोबत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेलेल्या दंतवैद्यक महाविद्यालयातील आदित्य अजित चव्हाण (वय २१, रा. अंबाजोगाई, बीड) हा मरण पावला.
तो केगाव येथील दीनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेजमध्ये प्रथम वर्षात शिकत होता. हिप्परगा तलाव परिसरात गेल्यानंतर आदित्यने मोबाईलवरून आईसोबत संवाद साधत तब्येतीची विचारपूस केली होती, अशीमाहिती त्याच्या मित्रांनी दिली. आदित्यची परीक्षा नुकतीच संपली होती. यामुळे परीक्षेचे दडपण कमी करण्यासाठी तो गुरुवारी सायंकाळी जवळपास सात ते आठ मित्रांसोबत हिप्परगा तलाव परिसरात फिरायला गेला होता
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाय घसरून तो पाण्यात गेला. गाळामध्ये अडकल्याने त्याला बाहेर निघता आले नाही. सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्यांनी आरडाओरड सुरू केली. पण याचा काही एक उपयोग झाला नाही. दरम्यान, ही घटना तालुका पोलिसांना कळाली. त्यांनी लगेच घटनास्थळी
धाव घेतली. पण रात्री आदित्यचा शोध लागला नाही. सकाळी अग्निशामक दलाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने आदित्यला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
दरम्यान, त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्याच मृतदेह पाहून नातेवाइकांनी हंबरडा फोडला. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला .त्याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ आहे. या घटनेची नों द सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे.