सोलापूर : वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट एमआयडीसी भागात अग्निशामक दल केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची पाहणी केली असून ले आउंट प्रस्ताव सादर तयार करण्यासंदर्भातील सूचना महापालिका आयुक्त शीतल तेली- उगले यांनी दिल्या आहेत.
शहरालगतच अक्कलकोट एमआयडीसी आहे. या पाचशे एकरावरील परिसरात यंत्रमाग, गारमेंट कारखाने आहेत. शिवाय अनेक छोटे- मोठे दुकाने, स्टॉल्स, कारखाने आहेत. मागील तीन वर्षात या भागात १६ आगीच्या घटना घडल्या आहेत.
यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. वारंवार घटना घडू लागल्याने आ. प्रणिती शिंदे यांच्यासह चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योजक, व्यापारी व या भागातील लोकप्रतिनिधी यांनी अक्कलकोट एमआयडीसीत अग्निशामक दलाचे केंद्र उभा करण्याची मागणी केली होती. त्यावर महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात एक शेड उभा करून एक गाडी उभी केली. जागेचा विषय पूर्ण होत नसल्याने केंद्र उभारणीला अडचण येत होती; मात्र आता आयुक्तांनी याकडे अधिक लक्ष घातल्याने लवकरच या केंद्राची उभारणीला मुहूर्त लागेल असा विश्वास उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
अक्कलकोट एमआयडीसी परिसरातील पाणी टाकीजवळ अग्निशामक दलाचे केंद्र उभारण्यासाठी योग्य जागा आहे. मात्र, ही जागा औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) ची आहे. महापालिका ही जागा मिळविण्यासाठी लवकरच ना हरकत पत्र घेऊन केंद्रासाठीचा ले आउंट करून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे.
अक्कलकोट एमआयडीसी परिसरात अग्निशामक दलाची उभारणी करण्यासाठी मोठ्या निधीची गरज आहे. या निधीसाठी डीपीसीकडे मागणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त शीतल तेली-उगले यांनी दिली. लोकप्रतिनिधी व व्यापारी, उद्योजकांनी केलेल्या मागणीला आता यश येतानाचे दिसून येत आहे.