27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeसोलापूरचारचाकी वाहने चोरणारा गजाआड

चारचाकी वाहने चोरणारा गजाआड

एकमत ऑनलाईन

मोहोळ : पोलिसांनी एका प्रकरणात तातडीने हालचाली करत एका सराईताच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी गणेश माडकर या आरोपीला अटक केली. आणि त्याच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. कोर्टाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.

कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत (मोजे हराळवाडी, ता. मोहोळ) येथे राहणारा इसम गणेश हिंदूराव माडकर हा मैत्री करून विश्वास संपादन करत होता. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे, त्यांच्या सोबतच तो मैत्री करत होता. फिरायला जायचं आहे, असं सांगत चारचाकी वाहन घेऊन जात होता. परस्पर त्याची विक्री करून मौज करत होता. हे प्रकरण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या कामती पोलीस ठाण्यात दाखल होताच संशयित आरोपीचा छडा लावून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. आणि १ कोटी २० लाख ५० हजार रुपये किमतीची चारचाकी वाहने जप्त करून पोलीस कोठडीत त्याची रवानगी केली आहे. वाहन मालकांचा विश्वास संपादन करायाच अन्… गणेश माडकर हा सोलापूर येथे कामाला होता. ज्या ठिकाणी नोकरी करत होता, त्यामधून त्याची चैनी भागत नव्हती. तो गावी आल्यानंतर गावातील तसेच जवळपासच्या गावातील ज्या नागरिकांकडे चारचाकी वाहन आहे, अशा लोकांना विश्वासात घेवून त्यांच्याशी मैत्री वाढवत होता.

मला फिरायला जाण्यासाठी गाडी पाहिजे, असं सांगून तो वाहन घेवून जायचा. आणि परत न करता त्याचा वाहनाचा परस्पर अपहार करत होता. गणेशने काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्यातील कोरवली येथील एका नागरिकास विश्वासात घेवून त्याच्याकडून स्विफ्ट डीझायर कार ( एम.एच.-१३/डीटी-२४०२) ही गेल्या महिन्यात २२ फेब्रुवारी घेवून फिरून आल्यानंतर परत करतो, असं सांगून घेवून गेला होता.

पण तो वाहन परत देतच नव्हता. चारचाकी वाहनधारकाने गणेशकडे वेळोवेळी कारची मागणी केली होती. पण तो टाळाटाळ करत होता. आज देतो, उद्या देतो” असं सांगून वेळ मारून नेत होता. तसेच गणेश अनेक दिवसांपासून गावातूनही गायब झाला होता. अखेर वाहन मालकाने कामती पोलीस ठाण्यात गणेश माडकर विरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी त्याचा तपास करत, मोबाइल लोकेशन काढले आणि त्याला ताब्यात घेतले. आणि पोलीस तपासामध्ये त्याचं बिंग फुटले.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, अमोल भारती, कामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बबन माने व पथक हे करत होतं. संशयित आरोपी गणेश माडकर याला विश्वासात घेवून तपास केला असता धक्कादायक माहिती समोर आली.

कामती व त्याभागातील ट्रॅक्टर, बलेनो, बोलेरो, स्कॉर्पिओ, इर्टीगा, क्रुझर, इनोव्हा, स्वीप्ट कार व मोटारसायकल अशी एकूण २५ वाहनं त्यानं विश्वासानं ताब्यात घेतली आणि ती परत केली नसल्याची माहिती दिली. कामती पोलीसांनी केलल्या तपासामध्ये ८ ट्रॅक्टर, १४ जीप/कार, व ४ मोटार सायकल अशी एकूण २५ वाहने जप्त केली आहेत. याची एकूण किंमत १ कोटी २० लाख ५० हजार रुपये इतकी आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपी गणेशला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी कामती पोलिस ठाणेमधील पोलीस अंमलदार बबन माने, यशवंत कोटमळे, अमोल नायकोडे, भरत चौधरी, जगन इंगळे यांनी पार पाडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या