बार्शी : शनिवारी दिवसभर दुसऱ्याच्या काम शेतात करून दोन महिला सायंकाळी गावाकडे निघाल्या असता ओढ्यात दोघीही पाय घसरून पाण्यात पडल्या आणि पाण्याच्या प्रवाहामुळे वाहत गेल्या. त्यातील एका महिलेला पोहता येत असल्याने ती लगेच किनाऱ्याला लागली. दुसरी महिला मात्र वाहून गेली. तिचा मृतदेह रविवारी (दि. ३१) सकाळी एका पाइपला अडकल्याने सापडला.
ही घटना शनिवारी बार्शी उस्मानाबाद रोडवरील नारीवाडी जवळील वाघ ओढ्यात सायंकाळी ५च्या सुमारास घडली आहे. मयत रुक्मिणी हरिदास बदे (वय ४०) व प्रियांका भोसले या दोन्ही महिला गावातील लहू भोसले यांच्या शेतात मजुरीसाठी गेल्या होत्या. कारी व नारीवाडी परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. पावसामुळे काम बंद करून त्या महिला गावाकडे निघाल्या होत्या. वाटेतील वाघ ओढ्यातूनच त्या महिला पलीकडे जात होत्या. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी पाय घसरून पाण्यात पडल्या. तेव्हा प्रियांका भोसले यांना पोहता येत असल्याने पाण्यात पडताच त्या कडेला पोहत आल्या, तर रुक्मिणी बदे यांना पोहता येत नसल्याने त्या वाहून गेल्या.