पंढरपूर : बलात्काराची केस मिटवून घेण्यासाठी एक महिला व पुरुष या दोघांनी राहत असलेल्या घराचा अर्धा हिस्सा व १० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे तरुणाने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली सोपान हजारे यांचे एका महिलेबरोबर मागील दहा वर्षांपासून संबंध होते. त्या महिलेने तक्रार दिल्याने ज्ञानेश्वरवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान ज्ञानेश्वर हा जामिनावर सुटून आला होता. त्यानंतरही त्या दोघांमध्ये संबंध सुरूच होते. त्यानंतर ती महिला ज्ञानेश्वर यांच्याकडे गुन्हा मागे घेण्यासाठी सतत पैसे मागत होती. पैसे नाही दिले तर पुन्हा खोटा गुन्हा दाखल करून कारागृहात पाठवीन, अशी धमकी देत होती. तसेच ज्ञानेश्वर यांच्या पत्नीबरोबरही भांडण करत होती.
मागील दोन महिन्यांपासून आणखी एका पुरुषाबरोबर त्या महिलेचे संबंध जुळले. ते दोघे मिळून ज्ञानेश्वर यांना तू पैसे दे, नाही तर तुझ्याविरुद्ध गुन्हा दाखल करीन, अशी धमकी दिली. याबाबत ज्ञानेश्वर यांनी स्वत:च्या आईला व घरातील लोकांना सांगितले ‘तो’ शनिवारी मानसिकरीत्या खचलेला दिसून आला होता. रात्रभर झोपला नाही. बलात्काराची केस मिटवून घेण्यासाठी पैशाच्या मागणीवरून दमदाटी व मारहाण करून व दिलेल्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून रविवारी सकाळी ११:३० वाजेपूर्वी ज्ञानेश्वर यांनी राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी संबंधित महिला आणि तिचे संबंध आलेला दुसरा पुरुष या दोघांविरुद्ध पंढरपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.