सोलापूर : कर्जाला कंटाळून खासगी फायनान्समध्ये काम करणाऱ्या तरुणाने रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. वीरेश श्रीपाद जीर (वय २८, रा. न्यू सुनीलनगर, एमआयडीसी), असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याने शनिवारी दुपारी रेल्वेखाली आत्महत्या केली.
शनिवारी दुपारी कंबर तलाव येथील ब्रिजजवळ एक तरुण रेल्वेखाली येऊन मृत झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या माहितीवरून रेल्वेचे पोलिस नाईक परमेश्वर खरात सोमेश्वर पट्टणशेट्टी आदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वीरेश हे रेल्वेपुलाखाली रेल्वेरुळावर आडवे झाले होते. त्यांच्या अंगावरून रेल्वे गेल्याने त्यांच्या शरीराचे दोन भाग झाले होते.
त्यांच्याजवळील आयडीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. दरम्यान, खरात यांनी उपस्थितांच्या मदतीने वीरेश यांना छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेविषयीची माहिती कळताच हॉस्पिटल परिसरात नातेवाइकांनी गर्दी केली होती.
वीरेश यांचा एका वर्षापूर्वीच विवाह झाला होता. त्यांना एक तीन महिन्यांची मुलगी आहे. त्यांनी शनिवारी सकाळी कंबर तलाव परिसरातील दर्ग्याजवळ आपली दुचाकी लावली आणि त्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, त्यांना कर्ज झाल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला.