मंगळवेढा : अनैतिक संबंधाच्या कारणावरून तुषार सूरज धनवडे (वय २५, रा. वाटंबरे) याचा खून केल्याप्रकरणी दत्तात्रय शिंदे (रा. गोणेवाडी) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार मयत तुषार सूरज धनवडे याचे एका अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध होते. यापूर्वी मुलीच्या नातेवाइकांनी मयतास संबंध तोडण्याबाबत समज दिली होती. मात्र, तो त्याकडे दुर्लक्ष करून प्रेमसंबंध ठेवत असल्याने नातेवाईक आरोपी दत्तात्रय शिंदे हा चिडून होता. २ जूनच्या सकाळी ७.१५ वाजेपूर्वी तो राहत असलेल्या घरापासून काही अंतरावर तुषारच्या पोटात आणि डोक्यावर धारदार हत्याराने मारून खून केला.
फिर्यादीच्या भावकीतील लग्न असल्याने मयत हा पाटखळ येथे लग्नाला आला होता. रात्री उशीर झाल्याने तो घराकडे परतला नाही. सकाळी वाटंबरेचे पोलिस पाटील पांडुरंग पवार यांनी तुषारच्या वडिलाला बोलावून गोणेवाडी हद्दीत तुषारचा खून झाल्याचे सांगितले. याची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच्या घराजवळ काही अंतरावर नांगरट केलेल्या शेतात तुषारचा मृतदेह निदर्शनास आला.वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी आरोपी दत्तात्रय शींदे यास ताब्यात घेऊन न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने आठ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.