सोलापूर: हुंड्यासाठी गर्भवती मुलीचा पैशासाठी छळ करून तिच्यावर विषप्रयोग करून ठार मारल्याचा संशय सासूने व्यक्त करत दिलेल्या फिर्यादीवरून जावयासह पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी मयत साक्षी बनसोडे यांची आई अनिता अमित झेंडे (रा. ४०, रा. संत गोरोबा काकानगर, उस्मानाबाद) यांनी सदर बाझार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
फिर्यादी अनिता झेंडे यांची मुलगी साक्षी यांचा शीतल नंदकुमार बनसोडे याच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर सासरचे लोक हुंड्यासाठी साक्षी यांना त्रास देऊन मारहाण करत होते. ती साडेसहा महिन्यांची गरोदर असतानादेखील तिच्या प्रकृतीची काळजी न घेता तिचा छळ केला, तिच्यावर विषप्रयोग केल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा संशय फिर्यादी यांना आहे.
शिवाय आरोपींनी साक्षीचे शवविच्छेदन करू दिले नाही अशा आशयाची फिर्याद अनिता झेंडे यांनी दिली आहे. या प्रकरणी पती शीतल बनसोडे, सासू पंचशील बनसोडे, दीर अभिजित बनसोडे, जाऊ प्रियंका बनसोडे, दीपक सोनकांबळे (सर्व रा. आंबेडकरनगर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे घटनेचा तपास सपोनि मुल्ला करत आहेत.