25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeसोलापूरडिसलेंवर शासनस्तरावरून कारवाई व्हावी

डिसलेंवर शासनस्तरावरून कारवाई व्हावी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डिसलेंवर शासन स्तरावरूनच कारवाई व्हावी, अशी भूमिका घेतली आहे. गैरवर्तन करूनही डिसले अधिकाऱ्यांची बदनामी करीत असल्याने त्यांच्यावरील चौकशींचे दोन्ही अहवाल आता शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्तांकडे पाठवले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

कायदा सर्वांना समान असतो. कायद्यात चुकीला माफी नसते. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर नेमणूक असतानाही तीन वर्षे (२०१७ ते २०२०) गैरहजर राहिलेले रणजितसिंह डिसले सध्या अडचणीत सापडले आहेत. दोन्ही चौकशी समित्यांच्या अहवालात त्यांची गैरहजेरी उघड झाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी मुख्याध्यापकाचा युजर आयडी, पासवर्ड वापरून त्या काळातील वेतन घेतले आहे. वास्तविक पाहता वेतनासाठी डायट कडून हजेरी रिपोर्ट घेऊन वेतन काढणे अपेक्षित होते.

तीन वर्षांत अनेकदा चूका करूनही अधिकाऱ्यांनीच आपल्याकडे पैसे मागितल्याचा थेट आरोप त्यांनी केला होता. तत्पूर्वी, प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांनी राज्यपालांना शाळेला भेट देण्याचे निमंत्रण पाठविले होते. अधिकाऱ्यांनी केलेले कॉल ते घेत नव्हते. अशा बाबींमुळे त्यांच्याबद्दलचा रोष वाढला आणि प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पूर्वीच्या चौकशी समितीचा अहवाल दुसरी समिती नेमून पडताळला. त्यात डिसले गुरुजींच्या आणखी काही चूका समोर आल्या. त्यानंतर निश्चितपणे कारवाई होणार असल्याची जाणीव डिसलेंना झाली आणि त्यांनी ७ जुलैला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे राजीनामा सोपविला. नव्या सरकारकडून आपल्याला सहानुभूती मिळेल म्हणून त्यांनी राजीनामानाट्य केल्याची चर्चा प्राथमिक शिक्षण विभागात सुरु झाली. आता सरकारकडून डिसले गुरूजींच्या चूका माफ होणार की नियमानुसार इतरांप्रमाणे कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

परितेवाडी (ता. माढा) येथील झेडपी शाळेवरील उपशिक्षक रणजितसिंह डिसले हे ग्लोबल होण्यापूर्वी त्यांची प्रतिनियुक्ती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेवर (डायट) होती. जवळपास ३२ महिन्यांत एकच दिवस त्यांनी तेथे हजेरी लावली. तरीपण, तत्कालीन अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर तीन वर्षांत कारवाई केली नाही, हे विशेष. आता दोनवेळा चौकशी झाल्यानंतर ते परस्पर गैरहजर राहिल्याचे सिध्द झाले. कारवाई होणार असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी राजीनामा अस्त्र वापरले. क्यूआर कोड शिक्षण पध्दती, ग्लोबल टिचर पुरस्कार, फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजेची मागणी आणि आता राजीनामा, यामुळे डिसले गुरुजी पुन्हा राज्यभर पोहचले. त्यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची संधी मिळाली. सरकारच्या भेटीने कारवाई थांबेल, असा विश्वास त्यांना होता. पण, सरकारकडून जिल्हा परिषदेला किंवा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अद्याप कोणतेही आदेश वा सूचना मिळालेल्या नाहीत.

रणजितसिंह डिसलेंवरील आरोपांची चौकशी पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कारवाईची कोणतीही नोटीस दिलेली नाही. अद्याप कोणतीही कारवाई देखील प्रस्तावित नाही. त्यांनी राजीनामा दिल्यावर कॉल करून कारण विचारले. त्यावेळी त्यांनी वैयक्तिक कारण सांगितले. पण, आता स्वत:ची चूक झाकण्यासाठी ते जाणिवपूर्वक अधिकाऱ्यांची व शिक्षण विभागाची बदनामी करीत आहेत.असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगीतले.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या