सोलापूर : मी राहतो त्या ठिकाणी मला वहिवाटीसाठी रस्ता दिला जात नाही. जोपर्यंत रस्त्याचा कागद मला दिला जात नाही, तोपर्यंत अंगावर कपडे घालणार नाही, असा हट्ट करीत वृद्ध व्यक्तीने दक्षिण तहसील कार्यालयात अर्धनग्न होऊन गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
दुपारी १२ वाजता दक्षिण तहसील कार्यालयात कुमार नामदेव मोरे (वय ७०, रा. शिंगडगाव, ता. दक्षिण सोलापूर) हे वृद्ध गृहस्थ आले. कार्यालयासमोर असलेल्या तिरंगा ध्वजाजवळ त्यांनी आपले कपडे काढले. त्यानंतर अर्धनग्न होऊन ते तहसीलदारांच्या केबीन शेजारी असलेल्या बाकड्यावर जाऊन बसले. मला न्याय मिळाला पाहिजे, माझा कागद का दिला जात नाही? असा जाब विचारण्यास सुरुवात केली. अर्धनग्न अवस्थेत वृद्ध गोंधळ घालत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोकांनी गर्दी केली. कुमार मोरे यांनी कार्यालयातील कर्मचा-यांचा निषेध करण्यास सुरुवात केली. मी माझा हक्क मागत आहे, मला आवश्यक असलेला कागद द्या, असे म्हणत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
कार्यालयातील कर्मचा-यांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी अधिका-याचे गार्ड असलेले एक पोलिस कर्मचारी तेथे आले. त्यांनी कुमार मोरे यांची समजूत काढली. तुमचे काय काम आहे? ते पूर्ण केले जाईल तुम्ही कपडे घाला असे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी कपडे घातले.