सोलापूर : नई जिंदगीमधील प्रभाकरनगर येथील सात वर्षांची मुलगी ऐमन बिराजदार हिचा रस्त्यावरील विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने मृत्यू झाला होता. याप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी आंदोलन करणा-या प्रहारच्या पाचजणांवर सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत नितेश काळे यांनी फिर्याद दिली आहे.
प्रभाकरनगरमध्ये ५ जानेवारी रोजी सायंकाळी ऐमन बिराजदार ही घराबाहेर खेळत असताना तिला विजेच्या खांबाचा धक्का लागल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करावा, नातेवाईकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करत आंदोलन करण्यात आले. याप्रकरणी प्रहारचे जमीर शेख, खालीद मणियार, रेश्मा मुल्ला, आकीब नाईकवाडी, इब्राहिम जमादार (सर्व रा. सोलापूर) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलिस नाईक मंजुषा वाघमोडे करत आहेत.