सोलापूर : अर्चना भोसले या विवाहितेचा गळफास देऊन खून केल्याच्या आरोपातून पती मोहन भजनदास भोसले, सासरा भजनदास अंबादास भोसले, आत्या सरूबाई भजनदास थोरात (रा. पापरी, ता. मोहोळ) यांच्याविरुद्ध भरण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी सोलापूर सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
मृत अर्चना भोसले ही मनोरुग्ण असल्याने सर्व आरोपींनी तिला त्रास दिला आणि तिचा नॉयलान दोरीने गळा आवळून खून केला आणि तिने आत्महत्या केली असे भासविले असे सरकार पक्षाचे म्हणणे होते. आरोपीचे वकील अॅड. धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, वैद्यकीय पुराव्यावरून अर्चना हिच्या मृत्यूचे कारण गळफास देऊन खून की तिने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबद्दल संदिग्धता आहे. अर्चना मनोरुग्ण होती, तिच्यावर वैद्यकीय उपचार चालू होते. तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. परंतु, तिचा खून झाल्याच्या समजुतीने आरोपीविरुद्ध खटला भरण्यात आलेला आहे. वैद्यकीय पुराव्यावरून तिने आत्महत्या केली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या खटल्यात आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने, अॅड. जयदीप माने, ॲड. विकास मोटे, अॅड. सिद्धेश्वर खंडागळे यांनी काम पाहिले.