प्रतिनिधी/ पंढरपूर
आजी, माजी सैनिक तसेच त्यांच्या कुटुंबियांचे विविध प्रश्न व समस्याचा निपटारा करण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या वतीने ‘अमृत जवान अभियान’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. आज सोमवार २३ मे २०२२ रोजी आजी व माजी सैनिकांचे 8 तक्रारी अर्ज प्राप्त असून अर्जाचा तत्काळ निपटारा करण्यासाठी सदर अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली असल्याची माहिती नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांनी दिली.
‘अमृत जवान अभियान’ या मोहिमेंतर्गत तालुक्यातील विविध गावांतील आजी-माजी सैनिकांचे 08 तक्रारी अर्ज प्रात झाले आहेत. यामध्ये अतिक्रमण, मोजणी, वीज कनेक्शन, रस्ता आदीबाबतचे अर्ज प्राप्त झाले असून, सदर अर्जाचा तत्काळ निपटारा करण्यासाठी अर्ज संबधित विभागाला कार्यवाही करण्यासाठी पाठवून दिले आहेत, असे श्री.श्रोत्री यांनी सांगितले.
‘अमृत जवान अभियान’ ही मोहीम 01 मे ते 15 जून 2022 या कालावधीत तहसिलदार सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून, माजी सैनिक, शहीद जवान, कर्तव्यावर असणा-या सैनिकांच्या व कुटुंबीयांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यात येणार आहेत. महसूल, भूसंपादन, पुनर्वसन, विविध प्रकारचे दाखले, ग्रामविकास, कृषी विभागाकडील विविध लाभाच्या योजना मिळवण्यासाठी तालुक्यातील माजी सैनिक, सैनिकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. श्रोत्री यांनी केले आहे.